सुधीर फडके
सुधीर फडके
शब्द आणि भावनांना सुरांची साथ देत अजरामर सुगमसंगीताची निर्मिती करणारा स्वरगंधर्व
रामचंद्र विनायक फडके—म्हणजेच 'बाबूजी' या नावाने प्रसिद्ध असलेले सुधीर फडके—यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूर येथे झाला. घरी सगळे त्याला राम म्हणत.
त्याचे वडील कोल्हापूरमधील प्रसिद्ध वकील होते. स्थानिक लोक त्यांना 'कोल्हापूरचे टिळक' असे म्हणत असत. त्यांना संगीताची विलक्षण आवड होती. त्यामुळे त्या काळातील अनेक नामवंत नट आणि गायक त्यांच्या घरी मुक्कामाला येत असत. त्यांनी अनेक श्रेष्ठ गायकांच्या ग्रामोफोन रेकॉर्ड्सचा संग्रहही केला होता.
रामच्या आईचे नाव सरस्वती होते. त्यांना चार भावंडे होती; मात्र त्यांपैकी रामव्यतिरिक्त कोणीही संगीत क्षेत्रात आले नाही. त्यांचे मोठे मामा डॉ. भा. चिं. पटवर्धन यांना गाण्याची विशेष आवड होती, तर धाकट्या मामाचा आवाजही अतिशय सुरेल होता. त्यामुळे संगीताचा वारसा बाबूजींना त्यांच्या आजोळकडून मिळाला असावा, असे वाटते.
त्या काळी कोल्हापूर हे संगीतप्रेमींचे माहेरघर मानले जात असे. गावोगावी पोवाडे आणि लावण्या ऐकायला मिळत. मंदिरांमधून टाळ, मृदुंग आणि वीणेच्या साथीने भजने गायली जात, हरिनामाचा गजर घुमत असे. गावातील प्रतिष्ठित लोकांच्या घरी तंबोऱ्याच्या साथीने रंगणाऱ्या बैठकीच्या मैफिलीही होत असत. अशा या संगीतमय वातावरणात रामचा जन्म झाला. विविध प्रकारचे संगीत ऐकत ऐकतच त्याचे बालपण घडत गेले.
त्या काळी कोल्हापूर हे केवळ संगीताचेच नव्हे, तर एकूणच कलेचे माहेरघर होते. अनेक नामवंत गवई तेथे वास्तव्यास होते. त्यांपैकी पंडित वामनराव पाध्ये हे एक मान्यवर नाव होते. सर्वजण त्यांना प्रेमाने 'पाध्येबुवा' म्हणत. त्यांनी कोल्हापूरमध्ये 'गांधर्व महाविद्यालय' स्थापन केले होते. मुंबई-पुण्यासारख्या शहरांत जाऊन पैसा कमावण्यापेक्षा विद्यार्थ्यांना येथेच शास्त्रीय संगीताचे शिक्षण देऊन त्यांना तरबेज कलाकार घडवावे, अशी त्यांची भूमिका होती.
छोटा राम रस्त्यावरून जाणाऱ्या गोसावी, बैरागी यांचे गाणे ऐकून त्यांची हुबेहूब नक्कल करीत असे. हे पाहून वडिलांनी रामला संगीत शिकवायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी त्याला पाध्येबुवांकडे नेले. पाध्येबुवांनी रामला गाऊन दाखवायला सांगितले. रामने त्याला येत असलेली एक-दोन गाणी म्हणून दाखवली. त्याचे गाणे ऐकून बुवा एकदम खुश झाले आणि त्यांनी त्याला थेट तिसऱ्या वर्गात नेऊन बसवले.
या ‘गांधर्व विद्यालयात’ वातावरण अत्यंत सात्त्विक आणि प्रेमळ होते. राम तिथे अगदी रमून गेला. बुवा तालाच्या पक्केपणावर खूप भर द्यायचे. ते उत्तम ठुमऱ्या गायचे. राम स्वतः गाणं शिकायचाच; पण त्याचबरोबर बुवा इतर मुलांना गाणं कसं शिकवतात, हेही बारकाईने पाहायचा. बुवा रामच्या गाण्यावर खूप खुश होते. त्यांना वाटायचे, हा मुलगा संगीतात नाव कमावणार. प्रत्यक्ष शिकणे आणि संगीत जाणिवेने ऐकणे किती महत्त्वाचे आहे, हे बुवांना माहीत होते. म्हणूनच ते रामला शिकवणी झाल्यानंतरही वर्गात थांबवून घ्यायचे. दिवसातील चार-पाच तास तो तिथेच असायचा. त्यामुळे रामची गाण्याची समज अधिक विकसित झाली.
एखादं गाणं ऐकताच राम त्याचं नोटेशन लगेच काढू शकतो, असा बुवांचा त्याच्यावर विश्वास होता. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरावा अशी एक घटना थोड्याच दिवसांत घडली.
कोल्हापूरला गांधर्व महाविद्यालयातर्फे ‘अखिल भारतीय संगीत परिषद’ भरली होती. भारतातील नामवंत गायक त्या परिषदेसाठी कोल्हापूरला आले होते. एक दिवस पाध्येबुवांनी छोट्या रामला सर्वांसमोर उभे केले आणि म्हणाले,
“हा मुलगा उत्तम नोटेशन करतो. तुम्ही कोणीही तराणा, बंदिश किंवा ख्याल म्हणा. दुसऱ्याच क्षणी हा त्याचे नोटेशन करून दाखवेल.”
कित्येक नामवंत गवयांनी निरनिराळ्या रागांतील आलाप आणि ताना घेतल्या. रामने त्यांचे नोटेशन काढून ते गाऊनही दाखवले. जमलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. पाध्येबुवांनी आपल्या शिष्यावर जो विश्वास टाकला होता, तो सार्थ ठरला.
पाध्येबुवांसारख्या महर्षींच्या मार्गदर्शनाखाली राम संगीतात उत्तरोत्तर प्रगती करत होता. त्यांनी रामकडून अनेक अभंग तयार करून घेतले. ताना घेण्यात पाध्येबुवा पटाईत होते. पाध्येबुवांनी रामकडूनही त्याची तयारी करून घेतली. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग किंवा कसोटीचा क्षण आला, तरी मनाचा तोल न ढळू देता त्याला सामोरे कसे जायचे, हे त्यांनी राम आणि इतर शिष्यांना आपल्या आचरणातून शिकवले.
शब्दांच्या शुद्ध उच्चाराला पाध्येबुवा खूप महत्त्व देत असत. याचा पुढे रामला मोठा फायदा झाला. जेव्हा तो चित्रपटांना संगीत देऊ लागला, चाली लावू लागला, तेव्हा या सर्व गोष्टी तो कटाक्षाने लक्षात ठेवत असे. अर्थाला साजेशी चाल लावणे आणि शब्दांचे स्पष्ट, शुद्ध उच्चार होण्यावर भर देणे, हे पहिले संस्कार पाध्येबुवांनीच त्याच्यावर केले.
सुट्टीत राम आणि त्याची भावंडे जामखिंडीला मामाकडे जात असत. तिथे मामा रामचं गाणं ऐकण्यासाठी मोठमोठ्या लोकांना बोलावत असे. पाध्येबुवांचे गुरुबंधू पटवर्धनबुवा जामखिंडीत होते. मामाकडे गेले असतांना राम तिथे त्यांच्याकडे गाणं शिकायला जात असे.
एकंदरीत संगीत क्षेत्रात रामची वाटचाल व्यवस्थित सुरू होती. त्यालाही आपण मोठा गवई व्हावं, असं मनापासून वाटत असे. या सर्व गोष्टींमुळे त्याच्या भावी कारकीर्दीची नकळत तयारी होत होती.
राम तिसरीत असताना, म्हणजे १९२८ साली, त्याची आई क्षयरोगाने आजारी पडली. थोड्याच दिवसांत तिचे निधन झाले. तेव्हा राम अवघा आठ-नऊ वर्षांचा होता.
पत्नीच्या निधनानंतर विनायकरावांना, म्हणजे रामच्या वडिलांना, वकिलीत रस राहिला नाही. हळूहळू त्यांची वकिली कमी झाली आणि घराला उतरती कळा लागली. शेवटी घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली की, घरातील एकेक वस्तू विकण्याची वेळ आली. एवढे करूनही काही भागत नव्हते. सकाळी भात खायला मिळाला, तर संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत असे. अशी हलाखीची परिस्थिती निर्माण झाली.
घरात खायला सहा तोंडे होती—पाच भावंडे आणि वडील. आई वारली तेव्हा रामचा मोठा भाऊ नववीत होता, तर सर्वांत धाकटा भाऊ अवघा अकरा महिन्यांचा होता. या धाकट्या भावाला वडिलांनी शेजारी राहणाऱ्या गंगूबाईंकडे सोपवले. गंगूबाई खानावळ चालवत असत. त्यांनी त्या मुलाचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. रामपेक्षा लहान असलेल्या लक्ष्मणाला धाकट्या मामीने आपल्या घरी नेले.
अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली.
१९२९ च्या दिवाळीत राम मामाकडे जामखिंडीला गेला होता. नेहमीप्रमाणे मामांनी रामचे गाणे ऐकण्यासाठी अनेक लोकांना बोलावले होते. त्यावेळी मुंबईहून डॉ. भाजेकर आले होते. त्यांनी रामचे गाणे ऐकले आणि त्याला पुढील शिक्षणासाठी मुंबईला घेऊन जाण्याची तयारी दाखवली. रामच्या वडिलांनी त्याला मुंबईला पाठवण्यास संमती दिली. १९३० च्या जानेवारी महिन्यात राम मुंबईला डॉ. भाजेकर यांच्या घरी राहायला गेला.
डॉक्टरांनी रामचे नाव ‘आर्यन हायस्कूल’मध्ये घातले. तसेच ‘गुड्यानीवाले बशीर खाँ’ घरी येऊन त्याला संगीत शिकवू लागले. खरं तर रामचा शास्त्रीय संगीताचा पाया पक्का झाला होता. तो चार-पाच वर्षे पाध्येबुवांकडे गाणं शिकला होता. त्यांच्या तालमीत तो चांगलाच तयार झाला होता. पाध्येबुवा हे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या परंपरेतील शिष्य होते, तर बशीर खाँ यांची गायकी वेगळ्या घराण्याची होती. प्रत्येक घराण्याची आवाज लावण्याची पद्धत वेगळी असते.
डॉ. भाजेकरांना थोड्याच दिवसांत ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी बशीर खाँ यांची शिकवणी बंद केली. त्यानंतर त्यांनी रामचे नाव बाबुराव गोखले यांच्या ‘महाराष्ट्र संगीत विद्यालया’त घातले. बाबुराव गोखले हे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे भाचे होते. या संगीत विद्यालयात राम काही चीजा आणि ख्याल शिकला.
गाण्यात अधिक प्रगती करण्याची एक उत्तम संधी रामला मिळाली. मुंबईला ‘सरस्वती संगीत विद्यालय’ होते. तिथे दरवर्षी शास्त्रीय संगीताच्या स्पर्धा होत असत. १९३१-३२ मध्ये बाबुराव गोखले यांनी रामला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाठवले. राम हा स्पर्धेतील सर्वांत लहान स्पर्धक होता. प्रत्येक स्पर्धकाने एक चीज म्हणायची होती. स्पर्धेचे परीक्षक होते अब्दुल करीम खाँसाहेब.
स्पर्धेत रामने मुलतानी रागातील एक चीज सादर केली. ती खाँसाहेबांना इतकी आवडली, की नियमाला अपवाद करून खाँसाहेबांनी त्याला दुसरी चीज म्हणायला सांगितली. अर्थातच या स्पर्धेत राम पहिला आला.
याच वेळी ‘कोलंबिया रेकॉर्ड कंपनी’ रामची बारा गाणी ध्वनिमुद्रित करण्यास तयार होती; पण बाबुराव गोखले यांनी त्याला परवानगी दिली नाही. त्यांना वाटले, राम अजून लहान आहे. एवढ्या लहान वयात प्रसिद्धी मिळाली, तर तो बिघडेल. अशा प्रकारे रामच्या आयुष्यातील प्रसिद्धीची पहिली मोठी संधी हुकली.
मुंबईत असताना रामने बालगंधर्वांची दोन नाटके पाहिली. त्यांचे गाणेही ऐकले होते. त्यातून त्याला एक महत्त्वाची गोष्ट समजली. प्रत्येक शब्दाला, प्रत्येक अक्षराला स्वतःची एक लय असते. ती नीट सांभाळली, तर त्या शब्दाचा आणि त्याच्या अर्थाचा परिणाम अधिक प्रभावी होतो. त्यामुळे शब्दांचा उच्चार स्पष्ट असला, तरच गाणे श्रोत्याच्या हृदयाला भिडते, ही जाणीव त्याला प्रथम झाली.
आर्यन शाळेत असताना राम मेळ्यांत सहभागी होत असे. तो नियमित व्यायामशाळेतही जात असे. त्यामुळे त्याची जडणघडण सर्व बाजूंनी होत होती.
पण काही कारणामुळे त्याला मुंबई सोडून पुन्हा कोल्हापूरला परत जावे लागले. यावेळी रामचे वय चौदा वर्षांचे होते. रामपेक्षा मोठा भाऊ वामन मॅट्रिक होऊन नोकरीला लागला होता. त्याला ‘नाना’ म्हणत असत. सर्वांत मोठा भाऊ ‘दादा’ नोकरीच्या शोधात होता.
घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिघडली होती, की वडिलांना त्यांची पुस्तकेही विकायला काढावी लागली. पुस्तके विकायची वेळ आल्याने त्यांना अत्यंत दुःख झाले; पण काही इलाज नव्हता. खाण्यापिण्याचीही वानवा झाली होती. काही दिवसांनी दादाला एका साखर कारखान्यात कारकुनाची नोकरी मिळाली.
रामला वाटत होते, आपणही काहीतरी छोटे-मोठे काम करून थोडे पैसे मिळवावेत आणि घराला हातभार लावावा. त्याप्रमाणे तो प्रयत्न करीतच होता. शेवटी त्याला ‘श्रीकृष्ण हार्मोनियम’ क्लासमध्ये गाणे शिकवण्याचे काम मिळाले.
एकीकडे तो शाळेत जात होता, तर संध्याकाळी पाध्येबुवांकडे जाऊन गाण्याचे शिक्षण घेत होता. घरी आल्यावर स्वयंपाक करणे, भांडी घासणे अशी कामेही करावी लागत होती. या सगळ्यात त्याचा इतका वेळ जात होता, की संगीताकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नव्हते.
शेवटी मामांनी एक उपाय सुचवला. ते म्हणाले,
“रामला संगीतातच कारकीर्द करायची आहे, तर मग इतर शिक्षण कशाला? त्याला फक्त इंग्रजी शिकू द्या.”
ही कल्पना सर्वांनाच पसंत पडली. रामचे नाव शाळेतून काढण्यात आले आणि तो फक्त इंग्रजी शिकण्यासाठी शाळेत जाऊ लागला. अशा प्रकारे रामने औपचारिक शिक्षणाला रामराम केला.
एकीकडे पैसे मिळवण्यासाठी धडपड चालू होती, तर दुसरीकडे संगीताची आराधना. गायक होण्यासाठी राम वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकत होता.
एकदा तो हिराबाई बडोदेकरांचे एक पद बसवत होता. त्याच वेळी त्यांचे स्नेही श्री. सदलगेकर तिथे आले. त्यांनी रामला सांगितले,
“हे पद म्हणण्यासाठी गळ्यात एक प्रकारचा वजनदारपणा यायला पाहिजे.”
त्यानंतर त्यांनी त्याला त्याबाबत मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन पुढे सुगम संगीत गायक म्हणून घडताना रामला फार उपयोगी पडले. त्याचा ताल पक्का होता. शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम होता. त्याला ख्याल, द्रुत, तराणा असे अनेक प्रकार गाता येत होते. सदलगेकरांनी त्याला स्वर छातीतून कसा लावायचा, हे शिकवले.
यानंतर रामला हिराबाई बडोदेकरांच्या गायनाने अक्षरशः वेड लावले. हॉटेलच्या बाहेर उभे राहून तो त्यांच्या रेकॉर्ड ऐकत असे आणि त्यांच्यासारखे गाण्याचा प्रयत्न करत असे. सातत्याने मेहनत केल्यामुळे त्याचा आवाज तयार होत होता. हिराबाई बडोदेकर आणि बालगंधर्व यांच्या रेकॉर्ड ऐकून त्याने आपली गायनशैली घडवली. एकलव्याप्रमाणे त्याने या दोघांनाच आपले गुरु मानले होते. गुरु समोर नव्हते; पण त्यांच्या गायनातून तो स्वतःला घडवत होता.
कोल्हापूरमध्ये ‘श्रीकृष्ण हार्मोनियम क्लासेस’चे ठाणेकर मास्तर गणेशोत्सवात आपल्या क्लासचा संगीतमेळा सादर करत. त्या मेळ्याला संगीत शिकवण्याची जबाबदारी लक्ष्मण बेर्लेकर आणि पुरषोत्तम सोळांकूरकर यांच्यावर असे. लक्ष्मण बेर्लेकरांचे गाणे लोकांना खूप आवडायचे. त्यांचे गायन अत्यंत आकर्षक होते. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम सोळांकूरकर यांच्या गाण्यालाही रसिकांची भरभरून दाद मिळायची. त्यांच्या गायनात एक वेगळीच रंगत होती.
रामच्या मनात अनेकदा प्रश्न यायचा,
"माझा पाया शास्त्रीय संगीताचा आहे. मी ताना, मुरक्या चांगल्या घेतो; पण माझे गाणे बेर्लेकर किंवा सोळांकूरकर यांच्या गाण्याइतके रंगतदार का वाटत नाही?"
या दोघांकडून त्याला केवळ गाणे नव्हे, तर गाणे सादर कसे करावे, याचाही महत्त्वाचा धडा मिळाला.
श्रीकृष्ण संगीतमेळ्याचे कवी आणि संवादलेखक होते न. ना. देशपांडे. सर्वजण त्यांना प्रेमाने 'नन्ना' म्हणत. नन्ना, ठाणेकर मास्तर आणि राम मिळून मेळ्याच्या जाहिराती व पोस्टर्स तयार करत. एके दिवशी नन्ना सहज म्हणाले,
"जाहिरातीत 'राम फडके' हे नाव काही विशेष वाटत नाही. आजपासून मी तुला 'सुधीर फडके' म्हणणार."
रामने या नव्या नावाला थोडा विरोध केला; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अशा प्रकारे १९३४ च्या गणेशोत्सवात रामचा 'सुधीर' झाला. पुढे हेच नाव त्याची कायमची ओळख बनले. १९३५ साली सुधीरच्या मोठ्या भावाचे, म्हणजे दादाचे, लग्न झाले. घरात पुन्हा स्त्रीचा वावर सुरू झाला. घराला घरपण आले. दादा आणि सुधीर दोघे मिळून पंचवीस रुपये कमवत होते. त्यात संसार बऱ्यापैकी चालत होता. सुधीरच्या वडिलांच्या आयुष्यात पुन्हा थोडे सुख आले; पण ते सुख त्यांना फार काळ लाभले नाही.
१९३६ च्या मार्च महिन्यात सुधीरचे वडील विनायकराव फडके यांचे अचानक निधन झाले आणि सुधीर खऱ्या अर्थाने पोरका झाला.