सुधीर फडके
सुधीर फडके
शब्द आणि भावनांना सुरांची साथ देत अजरामर सुगमसंगीताची निर्मिती करणारा स्वरगंधर्व
आपल्या व्याख्यानांतून, साहित्यांतून आणि कवितांतून हिंदुत्वाची प्रखर अभिव्यक्ती करणारे क्रांतिकारक, समाजसुधारक, हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर हे बाबूजींचे प्रेरणास्थान होते.
बाबूजींना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी खूप आदर आणि आत्मीयता होती. त्यांना वाटत होते की, आपण सावरकरांवर एक चित्रपट निर्माण करावा. त्यासाठी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे व बिंदूमाधव जोशी यांच्या समवेत 'सावरकर दर्शन प्रतिष्ठान' स्थापन केले. या प्रतिष्ठानतर्फे लोकांकडून निधी जमवण्यात आला आणि त्या निधीतून 'सावरकर' या हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. १६ नोव्हेंबर २००१ रोजी हा चित्रपट मुंबई, दिल्ली, नागपूर व इतर सहा शहरांत प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या निर्मितीस अनेक वर्षे लागली. त्यामुळे बाबूजींवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली.
अनेक आव्हानांवर मात करीत हा चित्रपट पूर्ण करण्यात आला. यात शैलेंद्र गौर यांनी सावरकरांची भूमिका साकारली आहे. दिग्दर्शन वेद राही यांचे असून संगीत बाबूजींचे आहे. या चित्रपटासाठी बाबूजींनी खूप परिश्रम घेतले. बाबूजींच्या संगीतामध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम व त्याग यांचा प्रभावी आविष्कार दिसून येतो. सावरकरांचे क्रांतिकारक विचार, अंदमानातील कारावासातील वेदना तसेच त्यांची राष्ट्रनिष्ठा हे सर्व बाबूजींच्या सुरांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. थोडक्यात, बाबूजी या चित्रपटाला जणू आत्माच प्रदान करतात. 'ने मजसी ने परत मातृभूमीला' व 'सागरा प्राण तळमळला' या सावरकरांच्या कवितांना या चित्रपटात महत्त्वाचे स्थान आहे. बाबूजींनी या गीतांना स्वरसाज चढविला आहे. "गीताचा आत्मा शब्दांत असतो; संगीत त्याला उंची देते," हे बाबूजींचे ठाम मत होते. "संगीत म्हणजे केवळ करमणूक नव्हे; ते संस्कारांचे माध्यम आहे," असे ते मानत. 'सावरकर' या चित्रपटात बाबूजींनी अनावश्यक नाट्यमयता टाळली आहे.
'वीर सावरकर प्रतिष्ठान' हे चित्रपटाच्या निर्मितीचे कार्य पाहत होते. संपूर्ण निर्मितीला आर्थिक व व्यवस्थापकीय आधार या संस्थेने पुरविला. लोकांकडून निधी गोळा करून हा चित्रपट निर्माण करण्यात आला. प्रतिष्ठानने चित्रपटाचा प्रचार व प्रसारही केला. सावरकरांचे जीवन, विचार व राष्ट्रभक्ती लोकांपर्यंत पोहोचवणे हा या चित्रपटनिर्मितीमागील मुख्य हेतू होता.
या चित्रपटासाठी दहा हजार लोकांनी निधी दिला. अगदी पन्नास रुपयांपासून निधी गोळा करण्यात आला. अटल बिहारी वाजपेयी यांनी अमेरिकेत व्याख्याने देऊन ५० लाख रुपये गोळा केले. आशा भोसले, पंडित भीमसेन जोशी आणि अनुप जलोटा यांनीही निधी गोळा करण्यात मोलाची मदत केली. यापद्धतीने लोकांकडून निधी गोळा करून निर्माण झालेला हा बहुधा पहिलाच चित्रपट असावा.
चित्रपटाचे पार्श्वसंगीत व गीते दोन्ही बाबूजींनी रचली. त्यांनी सावरकरांच्या कवितांना अत्यंत सुंदर व प्रभावी चाली दिल्या. चित्रपटाचा गंभीर सूर टिकून राहावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ते त्यात यशस्वी झाले. बाबूजींनी हा चित्रपट व्यावसायिक हेतूने निर्माण केला नाही; उलट तो त्यांनी आपली वैचारिक जबाबदारी म्हणून स्वीकारला. हे कार्य म्हणजे त्यांची सांस्कृतिक व सामाजिक सेवा होती, असे म्हणता येईल.
सावरकरांवरील चित्रपटाची निर्मिती करताना बाबूजींनी अतोनात कष्ट घेतले. ते शाळा-शाळांमध्ये कार्यक्रम करीत. त्या कार्यक्रमांत ते सावरकरांविषयी माहिती सांगत आणि काही बालगीते किंवा सावरकरांची गीते सादर करीत. विद्यार्थ्यांनी जी काही आर्थिक मदत केली, ती ते स्वीकारत असत. शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापकही आर्थिक मदत करीत असत.
एका कार्यक्रमाच्या वेळी अशी एक घटना घडली की, ललिताबाईंच्या पोटात भीतीने गोळा आला. बाबूजी आपल्या दोन सहकाऱ्यांसह वांद्रे (पूर्व) येथील एका लहान मुलांच्या शाळेत निधी गोळा करण्यासाठी गेले होते. कार्यक्रम उत्तम झाला आणि बाबूजी साधारण साडेअकरा वाजता गाडीने घरी निघाले. वांद्रे पुलावरील सिग्नलपाशी गाडी थांबली. बाबूजी स्टिअरिंगवर डोके ठेवून बसले. सिग्नल हिरवा झाला, तरी गाडी पुढे जाईना. शेवटी एक पोलीस तेथे आला. त्याने बाबूजींच्या शेजारी बसलेल्या जी. श्री. रानडे यांना, "काय झाले?" असे विचारले. परिस्थिती लक्षात आल्यावर पोलिसांनी बाबूजींना हलवून काय होत आहे, असे विचारले. बाबूजी म्हणाले,
"छातीत दुखत आहे. पण माझे घर जवळ आहे. मी हळूहळू गाडी घेऊन जातो."
त्यानंतर बाबूजींनी गाडी सरळ त्यांच्या डॉक्टरांच्या घरी नेली. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना चार दिवस रुग्णालयात राहावे लागेल, असे सांगितले. मात्र, बाबूजी त्यासाठी तयार होईनात. ते म्हणाले,
"मला खूप कामे आहेत. मी चार दिवस रुग्णालयात राहू शकत नाही."
असे म्हणून ते घरी आले आणि पेटी घेऊन बसले.
स्वतःचे कार्य ते असेच प्रकृतीकडे दुर्लक्ष करून पूर्ण करीत.
अशीच एक घटना गीतरामायणाच्या कार्यक्रमाच्या वेळी घडली. बाबूजी विदर्भात गीतरामायण सादर करण्यासाठी गेले होते. थंडीचे दिवस होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण एका उघड्या गाडीतून जवळच्या रेल्वे स्थानकाकडे निघाले. ते अंतर अंदाजे ३० किलोमीटर होते. मफलर आणि स्वेटर घालूनही थंडी जाणवत होती. साथीदार बाबूजींना सांगत होते,
"डोके वाऱ्यावर ठेवू नका. खाली वाका. वाऱ्याचा तुम्हाला त्रास होईल."
गाडी मिळेल की नाही, याची सर्वांना काळजी वाटत होती; कारण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाबूजींचा कार्यक्रम मुंबईतील रंगभवन येथे होणार होता.
सकाळी घरी आल्यानंतर बाबूजींच्या लक्षात आले की, त्यांचा एक डोळा बंद होत नव्हता आणि चूळ सरळ पडत नव्हती. त्यानंतर ललिताबाई आणि बाबूजी डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी त्यांना 'फेशियल पॅरॅलिसिस' झाल्याचे सांगितले. डॉक्टरांकडून परत आल्यावर विश्रांती घेण्याऐवजी बाबूजी कार्यक्रमाच्या तयारीला लागले.
संध्याकाळी गॉगल लावून ते रंगभवन येथे गेले. त्यांनी श्रोत्यांना वंदन करून रात्रीच्या प्रवासाचे वर्णन केले. त्यानंतर ते म्हणाले,
"मला फेशियल पॅरॅलिसिस झाला आहे. माझा एक डोळा मिटत नाही. माझे शब्द जर बोबडे यायला लागले, तर मी थांबेन. पुढचे गाणे म्हणणार नाही."
असे स्पष्टपणे सांगून त्यांनी कार्यक्रम सुरू केला आणि तो यशस्वीपणे पूर्णही केला. नंतर बाबूजी म्हणाले, "ही तर श्रीरामाची कृपाच आहे."
बाबूजी अत्यंत निश्चयी होते. त्यांनी जे ठरविले, ते काहीही झाले तरी पूर्ण केले. अमेरिकेत कार्यक्रम करताना त्यांना अनेकदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोटारीने प्रवास करावा लागत असे. अशा वेळी ते मोटारीतच रियाज करीत असत.
१९८४ मध्ये बाबूजींचा लंडनमध्ये कार्यक्रम ठरला होता. त्याच्या काही दिवस आधी त्यांचे मोठे बंधू नानासाहेब यांचे निधन झाले. बाबूजींचा नानासाहेबांवर अत्यंत जीव होता. त्यामुळे त्यांना कार्यक्रम रद्द करावा, असे वाटत होते. मात्र, नानासाहेबांच्या कुटुंबीयांनी त्यांना या विचारापासून परावृत्त केले आणि त्यानंतर बाबूजी लंडनला गेले.
बाबूजी कधीही कोणाला घाबरत नसत. आणीबाणीच्या काळात ते गीतरामायणाचे कार्यक्रम करीत आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी त्या वेळच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करीत. मित्रमंडळी त्यांना सांगत,
"कार्यक्रमाच्या वेळी साध्या वेशातील पोलीस येतात. तुम्ही आणीबाणी किंवा राजकारणावर बोलू नका. तुम्हाला पकडून तुरुंगात टाकतील."
त्यावर बाबूजी म्हणाले,
"चांगलेच होईल. मला तुरुंगात ठेवले, तर रियाज करायला भरपूर वेळ मिळेल आणि त्याचबरोबर विश्रांतीही मिळेल."
अर्थात, असे काही घडले नाही.
गीतरामायणाचे तसेच इतर गीतांचे ठिकठिकाणी कार्यक्रम करून बाबूजींनी 'वीर सावरकर' या चित्रपटासाठी निधी गोळा केला.
या चित्रपटामध्ये सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान प्रभावीपणे दाखविण्यात आले आहे. 'हिंदुत्व' या विषयालाही चित्रपटात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. अखेरीस चित्रपट पूर्णत्वास गेला. या चित्रपटासाठी एकूण साडेचार कोटी रुपयांचा खर्च झाला. त्यापैकी सरकारने दीड कोटी रुपयांची आर्थिक मदत केली.
१९९० साली या चित्रपटाचा पहिला मुहूर्त झाला. त्यानंतर अनेक वेळा दिग्दर्शक आणि पटकथालेखक बदलले गेले. सुरुवातीला विश्राम बेडेकर हे पटकथालेखक होते. बाबूजींनी त्यांना सावरकरांनी लिहिलेली तसेच सावरकरांवर लिहिलेली सर्व पुस्तके दिली. विश्राम बेडेकर यांनी अडीच वर्षे त्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी चित्रपटाची पटकथा लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी चित्रपटाचा अर्धा भाग लिहिला; मात्र ते लेखन पूर्ण करू शकले नाहीत. त्यानंतर अनेक लेखकांनी लेखनाचा प्रयत्न केला आणि त्यात काही वर्षे निघून गेली. चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपटाचा मुहूर्त झाला; परंतु जवळजवळ आठ वर्षे कोणतेही काम झाले नाही. त्यानंतर १५ सप्टेंबर १९९८ रोजी चित्रपटाचा दुसऱ्यांदा मुहूर्त झाला आणि राम गबाले दिग्दर्शक झाले. त्यानंतर मात्र चित्रपट पूर्ण झाला आणि अखेरीस प्रदर्शित करण्यात आला.
चित्रपट पूर्ण झाल्यानंतर बाबूजी म्हणाले,
"मी माझ्या आयुष्यातील एक फार मोठे कार्य पूर्ण केले आहे. आता मी मरण्यास मोकळा आहे."
संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण आणि प्रदर्शन सुरू असताना बाबूजी अत्यंत तणावाखाली होते. सावरकरांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला आहे, असे त्यांना वाटत असे. हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर गाजला. त्यानंतर २८ मे २०१२ रोजी तो गुजराती भाषेतही प्रदर्शित करण्यात आला.
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबूजी यांचे अतिशय जवळचे संबंध होते. ते दूरध्वनीवरूनही नियमित संपर्कात असत. विविध विषयांवर ते चर्चा करीत. सावरकरांवर चित्रपट निर्माण करावा, ही बाबूजींची अनेक वर्षांची इच्छा होती. या चित्रपटामुळे नवीन पिढीला सावरकरांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे विचार समजतील, अशी त्यांची मनापासून श्रद्धा होती. या चित्रपटासाठी त्यांनी आपली इतर कामे बाजूला ठेवली आणि स्वतःला पूर्णपणे या कार्यासाठी वाहून घेतले.
अखेरीस त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वास गेले. त्यांच्या अथक परिश्रमांना आणि लोकांवरील दृढ विश्वासाला मनःपूर्वक अभिवादन.