सुधीर फडके
सुधीर फडके
शब्द आणि भावनांना सुरांची साथ देत अजरामर सुगमसंगीताची निर्मिती करणारा स्वरगंधर्व
आयुष्याच्या सुरुवातीला अनेक चढ-उतार अनुभवले, पण उत्तरार्धात पैसा, मानसन्मान आणि नाव भरभरून मिळवलेली व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध संगीतकार, गायक, निर्माते, राष्ट्रप्रेमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि समाजाप्रती आपण काही देणं लागतो, असे मानणारे सुधीर फडके उर्फ बाबूजी.
‘स्वरगंधर्व’ सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे मूळ नाव रामचंद्र विनायक फडके. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विनायकराव हे नावाजलेले वकील होते, तर आईचे नाव सरस्वतीबाई. बाबूजींना चार भावंडे होती.
लहानपणापासूनच बाबूजींचा ओढा संगीताकडे होता. रस्त्यावरून एखादा बैरागी किंवा गोसावी गाणे गात जात असेल, तर ते त्याची नक्कल करीत असत. हे पाहून त्यांच्या वडिलांना, रामला संगीताची उत्तम जाण असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ते रामला घेऊन कोल्हापूरमधील पाध्येबुवांकडे गेले. पाध्येबुवांचे संगीत विद्यालय होते.
पाध्येबुवांमुळे रामच्या शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम झाला. त्यांनी रामच्या गळ्यावर उत्तम संस्कार केले. राम लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले आणि त्यानंतर घरातील परिस्थिती बिघडली. विनायकरावांचे मन वकिलीवरून उडाले. त्यांचा व्यवसाय मंदावला. त्यामुळे आर्थिक विवंचना सुरू झाली.
रामच्या एका भावाला धाकट्या मामीने सांभाळण्यासाठी नेले, तर दुसऱ्या भावाला जवळच राहणाऱ्या एका खानावळीच्या मालकिणीने सांभाळले. त्यामुळे घरात तीन भावंडे आणि वडील असे चौघेजण उरले. रामपेक्षा मोठ्या भावाला, नानाला, नोकरी लागली; पण त्या उत्पन्नात घरखर्च भागत नव्हता. त्या काळात रामने खूप कष्ट केले. सकाळी घरातील कामे, त्यानंतर शाळा, संध्याकाळी पाध्येबुवांकडे गाणे शिकणे आणि शिकवणे, असा त्याचा दिनक्रम होता.
पाध्येबुवा रामवर खूप खुश होते. राम एखादे गाणे ऐकले की त्याचे नोटेशन सहज काढत असे. एकदा एका संगीत अधिवेशनात छोट्या रामने मोठमोठ्या गायकांनी गायलेल्या ताना आणि चीजांचे नोटेशन काढून लगेच गाऊन दाखवले. त्यामुळे पाध्येबुवांचा रामवरील विश्वास योग्य असल्याचे सिद्ध झाले.
पुढे मुंबईचे डॉ. भाजेकर यांनी रामचे गाणे ऐकले आणि त्याला शिक्षणासाठी मुंबईला नेले. मुंबईत राम ‘आर्यन शाळेत’ शिकू लागला. त्याचबरोबर बाबुराव गोखले यांच्या ‘महाराष्ट्र संगीत विद्यालयात’ संगीताचे शिक्षण घेऊ लागला. या विद्यालयात काही ख्याल आणि चिजा त्याने शिकल्या. याच विद्यालयात असताना एका शास्त्रीय संगीत स्पर्धेत त्याने पहिला क्रमांक पटकावला. हे सर्व करत असतानाच तो व्यायामशाळेतही जात असे आणि जोर-बैठका काढत असे.
यानंतर काही दिवसांनी काही कारणास्तव त्याला भाजेकरांच्या घरातून बाहेर पडावे लागले. त्यानंतर तो कोल्हापूरला परत आला. घरातील आर्थिक विवंचना आणखी वाढली होती. त्यामुळे त्याने कोल्हापूरमधील एका वर्गात संगीत शिक्षकाची नोकरी स्वीकारली. याशिवाय त्याला गाण्याच्या काही शिकवण्याही मिळाल्या.
याच काळात त्याचा ‘श्रीकृष्ण संगीत मेळ्या’चे कवी श्री. न. ना. देशपांडे यांच्याशी परिचय झाला. देशपांडे यांनीच रामचे नाव ‘सुधीर’ असे ठेवले आणि पुढे आयुष्यभर तो ‘सुधीर फडके’ या नावानेच ओळखला जाऊ लागला.
याच वेळी १९३६ मध्ये त्यांचे वडील वारले आणि राम पोरका झाला. पुढे राम पुण्याला संगीत-शिक्षकाची नोकरी करण्यासाठी गेला. पण ते संगीत विद्यालय नीट चालले नाही. त्यामुळे पुढे तो मुंबईला गेला. मुंबईत त्याला रेडिओ स्टार होण्याची संधी मिळाली. तो महिन्यातून एकदा आकाशवाणीवर शास्त्रीय संगीत गात असे आणि त्यासाठी त्याला दरमहा दहा रुपये मिळत. मुंबईत तो संघाच्या कार्यालयात राहत असे. पुढे काही कारणामुळे त्याला संघाचे कार्यालय सोडावे लागले आणि त्यानंतर त्याच्या जीवनाची अधिकच फरफट सुरू झाली.
मुंबईत त्याने अत्यंत हलाखीचे दिवस अनुभवले. राहण्यासाठी जागा नव्हती. दिवसभर तो कुठेतरी वणवण भटकत असे. रात्री कधी बागेत, कधी रेल्वे स्थानकावर, तर कधी फूटपाथवर मिळेल तिथे झोपत असे. पैसे मिळाले तर काहीतरी खायचा; अन्यथा महापालिकेच्या नळाचे पाणी पिऊन पोट भरायचा. अशा प्रकारे त्याने अनेक दिवस काढले. धड झोप नव्हती, जेवण नव्हते आणि आयुष्यात स्थैर्यही नव्हते. याचा परिणाम त्याच्या तब्येतीवर झाला. मित्रांच्या सल्ल्याने त्याने मुंबई सोडली आणि त्यानंतर जवळपास दोन वर्षे तो भारतभर फिरत राहिला.
इंदूर, आग्रा, झाशी, गया अशा अनेक ठिकाणी तो भटकत राहिला. जिथे संधी मिळेल तिथे गाण्याचे कार्यक्रम करायचे, त्यातून पैसे मिळवायचे आणि कशीबशी गुजराण करायची, असे त्याचे जीवन झाले होते. कधी कार्यक्रम मिळत, तर कधी मिळत नसत. कधी अपमान सहन करावा लागे, तर कधी सन्मान मिळे. नियती त्याची सतत परीक्षा घेत होती. अनेकदा त्याला इतके नैराश्य येई की जीवन संपवावे, असे वाटे; पण प्रत्येक वेळी नियती त्याला जगण्याची नवी संधी देत असे.
दरम्यान या काळात तो हिराबाई बडोदेकर आणि बालगंधर्व यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून त्यांच्याप्रमाणे गाण्याचा प्रयत्न करीत असे. रामने त्या दोघांना आपले गुरु मानले होते. पुढे कुंदनलाल सैगल यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून त्यांच्याही शैलीचा अभ्यास केला. अशा प्रकारे तो या तिघांकडून एकलव्याप्रमाणे अप्रत्यक्षपणे शिकला.
शेवटी तो कलकत्त्याला गेला. तेथे त्याला शुक्ला नावाचा मित्र भेटला. तो ‘इंडिया रेकॉर्ड कंपनी’ मध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. त्याच्या ओळखीने रामला एच. एम. व्ही. कंपनीत गाणे ध्वनिमुद्रित करण्याची संधी मिळाली. मात्र, ध्वनिमुद्रण होण्यापूर्वीच मोठा भाऊ आजारी असल्यामुळे त्याला कोल्हापूरला परतावे लागले. कोल्हापूरला आल्यानंतर काही दिवसांनी त्याला एच. एम. व्ही. कंपनीकडून पत्र आले. त्यात लिहिले होते, "आमचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले आहे. सध्या कलकत्त्याला येण्याची आवश्यकता नाही."
आता पुढे काय करायचे, हा प्रश्न पुन्हा त्याच्यासमोर उभा राहिला. याच दरम्यान त्याचा मित्र माधव पातकर त्याच्याकडे आला आणि म्हणाला, "माझ्या एका कवितेला चाल लावून दे." ती कविता होती – ‘दर्यावरी नाच करी, होडी चाले कशी भिरीभिरी.’ रामने त्या कवितेला चाल लावली; पण पातकरला ती म्हणता येईना. त्यामुळे पातकर रामला एच. एम. व्ही. कंपनीत घेऊन गेला. तेथे वसंत कामेरकर अधिकारी होते. रामने ती चाल वसंत कामेरकर आणि ग. दि. माडगूळकर यांना ऐकवली. ती चाल त्यांना खूप आवडली आणि ते गाणे ध्वनिमुद्रित झाले. अशा प्रकारे राम, म्हणजेच सुधीर फडके, गायक आणि संगीतकार म्हणून एकाच वेळी प्रसिद्ध झाले.
यानंतर ते एच. एम. व्ही. कंपनीत नोकरीला लागले. त्यामुळे त्यांची चित्रपटसृष्टीशी ओळख झाली आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
१९४६ मध्ये सुधीर फडके यांनी ‘गोकुळ’ या हिंदी चित्रपटाला संगीत दिले. त्याच वर्षी स्नेहल भाटकर यांच्यासमवेत ‘रुक्मिणी स्वयंवर’ या मराठी चित्रपटाचे संगीतदिग्दर्शन केले. १९४८ मध्ये ‘जीवाचा सखा’ या मराठी चित्रपटाला त्यांनी स्वतंत्रपणे संगीत दिले. त्यानंतर त्यांच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत गेला.
१९४६ ते २००२ हा काळ बाबूजींच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ होता, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांनी अनेक चित्रपटगीते गायली. याशिवाय भक्तिगीते, भावगीते, पोवाडे आणि संगीताचे अनेक प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. त्यांना अनेक मान-सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी संगीतकार आणि गायक या दोन्ही भूमिका अत्यंत समर्थपणे पार पाडल्या.
शास्त्रीय संगीतापासून कोठी संगीतापर्यंत विविध संगीतप्रकार त्यांनी सहजतेने हाताळले. गायकांनी सुस्पष्ट आणि सुस्वर गायले पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता. सुस्पष्ट व अर्थगर्भ शब्दोच्चार, आशयघन आणि भावपूर्ण सादरीकरण, प्रसंगानुरूप जोशपूर्ण गायकी तसेच योग्य ठिकाणी मखमली, मधाळ स्वरांचा वापर ही त्यांच्या गायकीची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या चार दशकांहून अधिक प्रदीर्घ कारकिर्दीला ‘मराठी चित्रपटसंगीताचे सुवर्णयुग’ म्हणून ओळखले जाते.
बाबूजींचे संगीत मराठी रसिकांना आपलेसे वाटते. मराठी रसिकांना त्यांच्या स्वरांनी नेहमीच तृप्त केले आहे. मात्र बाबूजी स्वतः म्हणत असत,
"माझे संगीत केवळ मराठी नाही. माझ्या संगीतावर पंजाबी, बंगाली, राजस्थानी आणि उत्तर हिंदुस्तानी लोकसंगीताचा प्रभाव आहे. शिवाय हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, पाध्येबुवा आणि सैगल या माझ्या गुरूंचाही त्यावर प्रभाव आहे."
बाबूजींनी अनेक गीतकारांच्या गीतांना संगीत दिले. तसेच अनेक गायक आणि गायिकांसोबत काम केले. मराठीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिग्दर्शन केले. बाबूजी, ग. दि. माडगूळकर आणि राजा परांजपे या त्रिकुटाने एक काळ गाजवला.
‘गीतरामायण’ हे बाबूजी, म्हणजेच सुधीर फडके, यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च शिखर मानले जाते. १९५५ मध्ये आकाशवाणीचे पुणे केंद्र सुरू झाले. त्या वेळी सीताकांत लाड हे आकाशवाणी केंद्राचे संयोजक होते. त्यांनी प्रदीर्घ काळ चालणारा संगीत कार्यक्रम आकाशवाणीवरून सादर करण्याची कल्पना मांडली. त्यातूनच ‘गीतरामायण’ साकार झाले. गीते ग. दि. माडगूळकर यांनी लिहिली, तर त्यांना स्वरसाज बाबूजींनी चढवला. हा कार्यक्रम सलग ५६ आठवडे प्रसारित झाला. दर आठवड्याला एक गीत सादर केले जात असे.
बाबूजी केवळ संगीत क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते; त्यांनी सामाजिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या सामाजिक जाणीवा अत्यंत प्रखर होत्या. दादरा आणि नगर हवेली मुक्तिसंग्रामात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कोयना भूकंपाच्या वेळी त्यांनी भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी मोलाचे योगदान दिले. याच काळात, १९६७ मध्ये, त्यांना ‘फेशियल पॅरॅलिसिस’चा झटका आला. मात्र, स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता त्यांनी भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक कार्यक्रम केले. ध्येयाप्रती असलेली त्यांची निष्ठा विलक्षण होती.
ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निष्ठावान अनुयायी होते. सावरकरांच्या जीवनावर चित्रपट निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी ‘सावरकर प्रतिष्ठान निधी’ स्थापन करून लोकांकडून निधी गोळा केला. ठिकठिकाणी संगीताचे कार्यक्रम सादर करून त्यांनी आर्थिक मदत उभी केली. चित्रपट पूर्ण होण्यास बराच कालावधी लागल्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली; मात्र अखेर चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
‘सुगम संगीताचा सम्राट’ आणि ‘स्वरगंधर्व’ अशी बिरुदे लाभूनही बाबूजी अत्यंत साधे आणि विनम्र राहिले. नम्रता, साधेपणा आणि गोड स्वभाव ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांचे व्यक्तिमत्त्व ऋजु होते. त्यांच्या मनात प्रत्येकाविषयी आत्मीयता होती. त्यांचा शांत आणि प्रसन्न चेहरा पाहून समोरच्या व्यक्तीला त्यांच्याविषयी आदरयुक्त आपुलकी वाटत असे.
या संपूर्ण कारकिर्दीत त्यांच्या पत्नी ललिताबाईंनी त्यांना निष्ठेने आणि प्रेमाने साथ दिली. त्या स्वतः उत्तम गायिका होत्या; परंतु विवाहानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी आणि मुलासाठी समर्पित केले. बाबूजींच्या प्रत्येक कार्यात त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या.
आयुष्यभर केलेल्या अथक परिश्रमांमुळे बाबूजींचे शरीर थकले. अखेरीस त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. अत्यंत कृतार्थ जीवन जगल्यानंतर त्यांनी २९ जुलै २००२ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी समाज आणि मराठी चित्रपटसृष्टी एका अनमोल रत्नाला मुकली.