सुधीर फडके
सुधीर फडके
शब्द आणि भावनांना सुरांची साथ देत अजरामर सुगमसंगीताची निर्मिती करणारा स्वरगंधर्व
कोल्हापूरला सुधीरच्या घरासमोर राजोपाध्याय यांच्या वाड्यात गाडगीळ कुटुंब राहत होते. आई आणि तिची तीन मुले, एवढेच त्यांचे कुटुंब होते. त्या भावंडांपैकी एका मुलामुळे सुधीर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाऊ लागला. संघाचे तत्त्वज्ञान त्याला खूप आवडले. संघात उच्च-नीच, जात-पात, लहान-मोठा असा कोणताही भेदभाव नव्हता. त्यामुळे तो संघाकडे ओढला गेला.
याआधीच एकदा सुधीर वडिलांबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दर्शनाला गेला होता. त्याने त्यांच्यासमोर गाणे म्हणून दाखवले. सावरकरांनी त्याला शाबासकी देऊन ‘मोपल्यांचे बंड’ हे पुस्तक बक्षीस म्हणून दिले. तेव्हापासून सुधीरवर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. पुढे त्यांच्या विचारांविषयी त्याच्या मनात अपार आदर निर्माण झाला.
गाडगीळ कुटुंबातील मुले आपल्या आईला ‘माई’ म्हणत असत. त्या अत्यंत कर्तबगार आणि प्रेमळ होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या मुलांना मोठ्या धैर्याने वाढवले. याच माईंमुळेच सुधीर पुण्याला डॉ. मुंडले यांच्याकडे ‘गायन मास्तर’ म्हणून गेला. तेव्हा त्याचे वय अवघे सतरा वर्षांचे होते.
डॉ. मुंडले यांच्या पत्नी ‘गायन वादन विद्यालय’ सुरू करणार होत्या. पण ते विद्यालय फारसे चालले नाही. त्यामुळे सुधीरने मुंबईला जाऊन आपले नशीब आजमावण्याचे ठरवले.
कोल्हापूरला असताना तो पुण्याला संघाच्या शिक्षावर्गासाठी गेला होता. हा वर्ग चाळीस दिवसांचा होता. तेथे त्याची ओळख मुंबईचे संघ कार्यकर्ते श्री. गोपाळराव येरकुंटवार यांच्याशी झाली होती. ते राहण्याची व्यवस्था करतील, या आशेवर सुधीर मुंबईला आला.
राहण्याची सोय झाली; पण जेवायचे काय? सुधीरचा मोठा भाऊ नाना मुंबईत ड्रायव्हरची नोकरी करीत होता. सुधीर त्याच्याकडे गेला आणि म्हणाला,
“माझी महिनाभर जेवायची सोय करशील का?”
नानाने लगेच होकार दिला. दोघे भाऊ गिरगावातील ‘डेक्कन क्लब’मध्ये जेवायला जात असत. एके दिवशी नानाने तिथे श्री. निमकर यांच्याशी सुधीरची ओळख करून दिली. निमकर ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये अधिकारी होते. चार-पाच वर्षांपूर्वी एका संगीत स्पर्धेत त्यांनी सुधीरचे गाणे ऐकले होते. त्या वेळी त्याच्या रेकॉर्ड काढण्यासाठी त्यांनी बाबुराव गोखले यांच्याकडे परवानगीही मागितली होती.
निमकरांनी सुधीरला विचारले,
“रेडिओवर गाशील का?”
या एका प्रश्नाने सुधीरच्या आयुष्याला नवे वळण मिळाले.
दर महिन्याला रेडिओवर त्याचा एक कार्यक्रम होऊ लागला. त्यासाठी त्याला दहा रुपये मानधन मिळत असे. रेडिओवर तो प्रामुख्याने शास्त्रीय संगीत गात असे; कधी नाटकातील गाणीही सादर करत असे. त्याचबरोबर गाण्याच्या काही शिकवण्याही मिळाल्या. अधूनमधून मैफली होऊ लागल्या. संघातही तो बँड कमांडर म्हणून काम करू लागला. एकंदरीत त्याचे आयुष्य पुन्हा रुळावर येत असल्यासारखे वाटू लागले.
पण नियतीला ते मंजूर नव्हते.
काही गैरसमजामुळे सुधीरला संघाच्या कार्यालयातून सामानासकट बाहेर पडावे लागले. त्याची त्यात काहीच चूक नव्हती; पण त्याचा मोठा फटका मात्र त्याला बसला. १९३६ साली नशीब आजमावण्यासाठी कोल्हापूरहून मुंबईत आलेला हा तरुण १९३९ च्या सुरुवातीला अक्षरशः रस्त्यावर आला.
आता काय करायचे? राहायचे कुठे? हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला.
मुंबईचे फूटपाथच त्याचे आश्रयस्थान बनले. पुढचे काही दिवस अत्यंत हलाखीत गेले. कधी बागेत, तर कधी दुकानासमोरच्या फळीवर तो रात्र काढत असे. मध्यरात्री पोलीस येऊन, ‘इथे का झोपलास?’ असे विचारत त्याला हाकलून देत असत. पोटासाठी वणवण सुरू झाली. अन्न नव्हते, पुरेशी झोप नव्हती, अंगावर पुरेसे कपडे नव्हते, आणि कुणाची सहानुभूतीही नव्हती.
काही दिवसांनी रायकर नावाच्या मित्राने त्याला आसरा दिला. काही दिवस त्याने चहा विकला. भाजी विकली. पण कोणताही व्यवसाय टिकला नाही. शेवटी मोठा भाऊ नाना त्याला आपल्या घरी घेऊन गेला. तरीही सुधीर तिथे फार दिवस राहिला नाही. वाद्ये गहाण ठेवण्याची वेळ आली. त्यातच रेडिओचे कार्यक्रमही बंद झाले. संकटे आली की ती एकामागोमाग एक येतात, हेच खरे.
शेवटी हताश होऊन सुधीरने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला.
मुंबईने त्याला खूप काही दिले होते. रेडिओ कलाकार म्हणून ओळख दिली. अब्दुल करीम खाँ यांच्या हस्ते शास्त्रीय संगीत स्पर्धेचे प्रथम पारितोषिक त्याला इथेच मिळाले. ‘भिजलेली वात’ या नाटकाला संगीत देण्याची संधीही इथेच मिळाली. व्यायाम, संघकार्य आणि संगीत—या सगळ्यांनी त्याला घडवले. पण त्याच मुंबईने त्याला आयुष्यातील कठीण दिवसही दाखवले होते.
१ सप्टेंबर १९३९ रोजी सुधीरने मुंबईला निरोप दिला. नियतीच्या पुढे माणसाचे काही चालत नाही, हेच खरे.
मुंबई सोडल्यानंतर नाशिक, धुळे, अमळनेर, खांडवा, इंदूर, देवास, ग्वाल्हेर अशा अनेक ठिकाणी त्याची भटकंती झाली. कुठे गाण्याचे कार्यक्रम झाले, तर थोडे पैसे मिळत. त्यानंतर त्याने उत्तरेकडे प्रयाण केले. दिल्ली, आग्रा, मथुरा, अंबाला—कुठे कुठे नियतीने त्याला नेले! कानपूरला कोठीवर जाऊन त्याने गझल आणि कव्वाल्या ऐकल्या. जिथे जिथे तो जायचा, तिथले संगीत मनापासून ऐकायचा, ग्रहण करायचा आणि शिकायचा. या भ्रमंतीचा त्याला पुढील आयुष्यात मोठा उपयोग झाला.
अर्थात ही भ्रमंती काही सुखाची नव्हती. कधी जेवायला मिळत नसे, तर कधी राहायची सोय होत नसे. एखाद्याने पुढच्या गावात एखाद्या ओळखीच्या माणसाचा पत्ता दिला, तर तिथे काही पैसे मिळण्याची आशा वाटत असे. आयुष्याला स्थैर्य नव्हते. रोज नवे गाव, नवी समस्या. एखाद्या ठिकाणी कमाई होत असे, तर एखाद्या ठिकाणी निराशा पदरी पडत असे. एखाद्या ठिकाणी सन्मान मिळत असे, तर दुसरीकडे अपमान सहन करावा लागत असे. आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर सुधीरच्या आयुष्याची नौका हिंदकळत होती.
असे काही महिने गेले. या काळात त्याच्या आयुष्याला कुठलीच निश्चित दिशा मिळत नव्हती. आज इथे, तर उद्या तिथे. जसा मार्ग सापडेल, तसा तो भटकत असे. या भ्रमंतीत त्याला अनेक प्रकारची, वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसे भेटली. काहींनी त्याला मनापासून मदत केली, तर काहींनी अपमानित केले. कधी कधी त्याच्या मनात वाटत असे, ‘बास झालं. आता जीव द्यावा.’
"एक दिवस असा येतो, सारा मोहरा फिरून जातो.
वाटत असते अंधाराची वाट नाही संपायची,
आणि अचानक कोणीतरी मागून येते,
माझे डोळे झाकून घेते."
या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे सुधीरचे आयुष्य चालले होते. अशाच निराशाजनक मनःस्थितीत असताना गया येथील एका मंदिरात त्याचे गाणे ठेवण्यात आले. सुधीरने अत्यंत तन्मयतेने गायन केले. त्याचे गाणे इतके भावले, की मंदिराच्या पुजाऱ्याने देवाच्या गळ्यातला हार काढून सुधीरच्या गळ्यात घातला.
पुढे सुधीरला श्री. भागवत हे सद्गृहस्थ भेटले. सुधीरला बरे वाटत नव्हते, म्हणून भागवत त्याला आपल्या घरी घेऊन गेले. त्यांच्या घरी त्याला सैगल यांच्या रेकॉर्ड ऐकायला मिळाल्या. त्या त्याने वारंवार ऐकल्या आणि त्यांतील चाली व गाणी कंठस्थ केली.
सुधीरला जे उत्तम, सुंदर आणि उदात्त असे, ते सर्व आवडत असे. म्हणूनच हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, अब्दुल करीम खाँ आणि सैगल यांचे गायन त्याला विशेष प्रिय होते. या सर्वांच्या गायनशैली एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या होत्या; तरीही त्या त्याला तितक्याच आवडत. कारण तो खऱ्या अर्थाने चांगल्या कलेचा भोक्ता होता.
या सर्व भ्रमंतीमध्ये कधी कधी त्याच्या मनात इतके नैराश्य दाटून येत असे, की जीवन संपवावे असे वाटत असे. पण नेमक्या त्याच वेळी काहीतरी चांगले घडत असे आणि तो तो विचार सोडून देत असे. नियती त्याची कठोर परीक्षा घेत होती. पुढे त्याने गायलेले ‘कधी बहर, कधी शिशिर’ हे गीत त्या काळातील त्याच्या जीवनाचेच जणू प्रतिबिंब ठरले.
कलकत्त्यात असताना इंडिया रेकॉर्ड कंपनीने सुधीरच्या रेकॉर्ड काढण्याचे ठरवले. त्याच्या आवाजाची चाचणी झाली. सर्व काही निश्चित झाले. कलकत्त्यात अशी संधी मिळाल्यामुळे सुधीर आनंदात होता. आता उर्वरित आयुष्य इथेच घालवायचे, असे त्याने मनाशी पक्के ठरवले.
पण दैवाला ते मंजूर नव्हते. कलकत्त्यात असतानाच त्याला नानाकडून पत्र आले—’दादा आजारी आहे. ताबडतोब कोल्हापूरला जा’ पत्र मिळताच तो कोल्हापूरला परतला. तिथे काही दिवस राहिल्यानंतर तो कऱ्हाडला गेला. तिथे त्याला विषमज्वर झाला. त्या काळी हा आजार बरा व्हायला बराच वेळ लागत असे. कऱ्हाडहून तो पुन्हा कलकत्त्याला जाणार होता. पण ‘माणूस ठरवतो एक, आणि होते भलतेच’ असेच झाले. सुधीरचा ताप उतरायला दीड-दोन महिने लागले. तोपर्यंत कलकत्त्याहून त्याला पत्र आले,
“आता तुम्ही इथे येण्याची गरज नाही. आमचे रेकॉर्डिंग झाले आहे. पुढे बघू.”
१९३६ साली कोल्हापूरहून बाहेर पडलेला सुधीर नियतीने पुन्हा तिथेच आणून सोडला.
कोल्हापूरला असताना एक दिवस सुधीरचा बालमित्र माधव पातकर त्याच्याकडे एक कविता घेऊन आला. तो म्हणाला,
“सुधीर, माझ्या कवितेला चाल लावून दे. ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ (HMV) कंपनी इथे आली आहे. मी माझी कविता स्वतः गाऊन रेकॉर्ड करणार आहे.”
गीताचे बोल होते,
‘दर्यावरी नाच करी, होडी चाले कशी भिरी भिरी.’
त्या वेळी सुधीर मोकळाच होता. कलकत्त्याला जायचे नव्हते. त्यामुळे त्याने त्या गीताला चाल लावली. पण ती चाल पातकरला कठीण वाटली. तो सुधीरला म्हणाला,
“ही चाल तू वसंतराव कामेरकर आणि माडगूळकरांना ऐकवशील का?”
वसंत कामेरकर हे ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ कंपनीचे अधिकारी होते. सुधीरने लावलेली चाल त्यांना खूप आवडली. त्यांनी माडगूळकरांना सांगितले,
“तुम्ही अजून एक गीत लिहा. दोन्ही गीते सुधीर फडके गातील आणि आपण ती रेकॉर्ड करू.”
तो काळ दर्यागीतांचा होता. त्यामुळे ध्वनिमुद्रिकेच्या दुसऱ्या बाजूलाही कामेरकरांना दर्यागीतच हवे होते. माडगूळकरांनी तिथल्या तिथे दुसरे गीत लिहून दिले. त्याचे बोल होते,
‘दूर रे किनारा, सागरी पिसाटला वारा.’
सुधीरने त्यालाही संगीत दिले आणि ते स्वतःच गायले. संगीत देऊन स्वतः गायलेली ही त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका ठरली.
अशा प्रकारे सुधीरची दोन गाणी रेकॉर्ड झाली. पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे माडगूळकर आणि फडके ही जोडी एकत्र आली. पुढे अनेक वर्षे या जोडीने मराठी संगीतविश्वाला अमूल्य योगदान दिले.
रेकॉर्डिंग झाल्यावर वसंत कामेरकरांनी सुधीरला विचारले,
“तुम्ही मला रेकॉर्डिंग सेशनमध्ये मदत कराल का?”
सुधीरने लगेच होकार दिला. खरं तर लावणी, वग, पोवाडा अशा प्रकारच्या संगीताची त्याला काहीच माहिती नव्हती. माधव पातकरच्या रूपाने नियतीने आपल्या खेळातील एक प्यादे सुधीरकडे पाठवले आणि त्याला चांगले दान मिळाले. थोडक्यात सांगायचे, तर पुढे चित्रपटसंगीत दिग्दर्शक म्हणून सुधीरने जे मोठे काम केले, त्याची सुरुवात कामेरकरांमुळे झाली.
काही दिवसांनी कोल्हापूरला साहित्य संमेलन भरले. त्याचे अध्यक्ष प्र. के. अत्रे होते. संमेलनानंतर झालेल्या करमणुकीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदराव टेंबे होते. या कार्यक्रमात सुधीरने दोन-चार कविता आणि ‘दर्यावरी नाच करी’ हे गीत सादर केले. त्या दिवसापासून सुधीर फडके आणि ग. दि. माडगूळकर ही दोन्ही नावे कोल्हापूरकरांच्या परिचयाची झाली. पुढे या जोडीने मराठी चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात अनमोल कार्य केले.
१९४१ मध्ये सुधीर ‘एच. एम. व्ही.’ (हिज मास्टर्स व्हॉइस) या कंपनीत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले.
‘दर्यावरी नाच करी, होडी चाले कशी भिरी भिरी’ या गीतानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.