सुधीर फडके
सुधीर फडके
शब्द आणि भावनांना सुरांची साथ देत अजरामर सुगमसंगीताची निर्मिती करणारा स्वरगंधर्व
ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या जोडीचे सर्वोत्तम कार्य म्हणजे गीतरामायण होय. ग. दि. माडगूळकर यांनी वाल्मिकींच्या रामायणावर आधारित, मराठीत ५६ गीतांचे गीतरामायण रचले. १ एप्रिल १९५५ रोजी, रामनवमीच्या शुभमुहूर्तावर, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून गीतरामायण प्रथम प्रसारित झाले.
महाकवी वाल्मिकींनी रामायण हे महाकाव्य रचले. रामायण हे केवळ एक महाकाव्य नाही, तर भारतीय संस्कृतीचे एक चिरंतन प्रतीक आहे. राम हा परमेश्वराचा अवतार असला, तरी मानवरूप धारण केल्यानंतर त्यालाही इतर माणसांप्रमाणे जीवनातील सुख-दुःखांना सामोरे जावे लागले.
गीतरामायणाची सुरुवात श्रीरामांच्या अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगाने होते. महर्षी वाल्मिकी लव-कुशांना रामायण शिकवतात आणि ते अयोध्येत जाऊन श्रीरामांसह सर्व अयोध्यावासीयांसमोर ते गाण्याची आज्ञा देतात. लव-कुश जेव्हा आपल्या मधुर स्वरांत रामकथा गातात, तेव्हा ती ऐकून संपूर्ण सभा भारावून जाते. स्वतः श्रीरामांच्याही डोळ्यांत अश्रू उभे राहतात.
गीतरामायणाची गीते ग. दि. माडगूळकर यांनी रचली, तर त्यांना संगीत बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी दिले. हे सादरीकरण सुरू झाले, त्या वेळी दोघेही आपल्या कार्यक्षेत्रात सर्वोच्च स्थानी होते. दोघेही अत्यंत व्यस्त असतानाही त्यांनी संपूर्ण वर्षभर दर आठवड्याला एक नवे गीत तयार करून ते आकाशवाणीवरून सादर करण्याचे आव्हान आनंदाने स्वीकारले आणि ते यशस्वीपणे पूर्ण केले.
इतकी वर्षे लोटूनही गीतरामायणाची गोडी अजिबात कमी झालेली नाही; ती आजही अवीट आहे. गीतरामायणाचे अनेक भाषांत भाषांतर झाले असून अनेक गायकांनी ते सादर केले आहे. मात्र, या सर्व सादरीकरणांमध्ये सुधीर फडक्यांनी दिलेल्या मूळ चाली जशाच्या तशा जतन करण्यात आल्या आहेत.
गीतरामायणामध्ये एकूण ५६ गीते आहेत. ग. दि. माडगूळकर यांनी गीतांमध्ये ठिकठिकाणी संस्कृत शब्दांचा वापर केला असला, तरी ती समजण्यास अतिशय सोपी आहेत. गीतरामायणमधील प्रत्येक गीत आशय, काव्य आणि संगीत या तिन्ही दृष्टीने अत्यंत सुंदर आहे.
माडगूळकर म्हणतात, "गीतरामायण रामप्रभूंनीच माझ्याकडून लिहून घेतले आहे." रामकथेने हिंदू मनाला नेहमीच मोहिनी घातली आहे. आजही रामकथा घरोघरी वाचली जाते. रामायणाचे पारायण केले जाते. राम हा आदर्श आहे आणि कर्तव्यकठोर आहे; म्हणून लोकांना कृष्ण अधिक जवळचा वाटतो, तर राम आदर्श पुरुष म्हणून पटतो.
माडगूळकर व सुधीर फडके यांचा अपूर्व असा योग गीतरामायणात दिसून येतो. ग. दि. माडगूळकर गीते लिहून द्यायचे आणि पुढील सर्व जबाबदारी बाबूजींवर असायची. प्रत्येक भूमिकेसाठी वेगळा गायक निवडणे ही एक मोठी कसोटी होती, कारण हा कार्यक्रम श्राव्य माध्यमातून सादर केला जाणार होता. केवळ गीते ऐकून श्रोत्यांसमोर संपूर्ण रामायण उभे करणे आवश्यक होते. शिवाय प्रत्येक गीतात आठ कडवी असायची. प्रत्येक कडवे म्हणजे एक अंतरा. आठ अंतऱ्यांची गीते ऐकताना एकसुरीपणा वाटू नये, म्हणून बाबूजींनी प्रत्येक अंतरा वेगळ्या रागात बांधण्याचा प्रयत्न केला.
गीतरामायण हा एक चमत्कारच आहे. एकाच कवीने रचलेली आणि एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेली ही गीतमालिका म्हणजे आकाशवाणीच्या इतिहासातील वर्षभर सातत्याने प्रसारित झालेला एकमेव संगीत कार्यक्रम होय.
ऑगस्ट १९५३ मध्ये सीताकांत लाड पुणे आकाशवाणी केंद्रावर रुजू झाले. त्यांनी माडगूळकरांसमोर गीतरामायणाची कल्पना मांडली. ग. दि. माडगूळकर यांनी या कल्पनेला प्रतिसाद दिला आणि गीते लिहिण्याचे ठरविले.
पहिले गीत "स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती" हे होते. या गीताच्या निर्मितीच्या वेळी एक अद्भुत प्रसंग घडला. बाबूजींचे पुत्र श्रीधर यांना घटसर्प झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या कारणामुळे बाबूजी अत्यंत चिंतेत होते.
रेकॉर्डिंगच्या वेळी गीत लिहिलेला कागद त्यांना सापडला नाही. ते म्हणाले, "गीत लिहिलेला कागद मला मिळालाच नाही." मध्यरात्र झाली होती आणि गाणे ध्वनिमुद्रित होणे आवश्यक होते. ग. दि. माडगूळकर झोपले होते; परंतु त्यांना उठवणे भाग होते. सीताकांत लाड यांनी त्यांना आकाशवाणी केंद्रावर बोलावून घेतले.
बाबूजी आणि ग. दि. माडगूळकर यांच्यात थोडा वाद झाला; परंतु गीत प्रक्षेपित करणे अधिक महत्त्वाचे होते. शेवटी सीताकांत लाड यांनी माडगूळकरांच्या हातात कागद आणि पेन दिले व "हे गीत पुन्हा लिहा," अशी विनंती केली. माडगूळकर रागारागाने खोलीत गेले; पण थोड्याच वेळात त्यांनी ते गीत पुन्हा लिहून दिले.
श्रीधर यांच्या आजारामुळे बाबूजींची मनःस्थिती ठीक नव्हती. तरीही त्यांनी त्या गीताला अपूर्व चाल दिली आणि गीत ध्वनिमुद्रित झाले. पहिल्याच गीतातून ग. दि. माडगूळकर यांचे शब्दसामर्थ्य जाणवते, तर बाबूजींच्या चालीतील आणि स्वरातील माधुर्य मनाला स्पर्शून जाते.
रेकॉर्डिंग सुरू होण्यापूर्वी ग. दि. माडगूळकर म्हणाले, "सुरुवातीला कुश आणि लव 'श्रीराम, श्रीराम' असे तीन वेळा म्हणतील." परंतु पहाटे चार वाजता कुश-लव यांच्या वयाची मुले मिळणे अशक्य होते. त्यामुळे बाबूजींनी ललिताबाईंना रुग्णालयातून बोलावून घेतले. माणिक वर्मा स्टुडिओत उपस्थित होत्या. शेवटी या दोघींनीच 'लव-कुश' म्हणून "श्रीराम, श्रीराम" असे तीन वेळा उच्चार केले आणि गाण्याला सुरुवात झाली.
गीताची प्रत्येक ओळ अत्यंत सरस झाली आहे. त्या वेळी स्टुडिओत बालगंधर्व उपस्थित होते. बाबूजींनी त्यांचे आशीर्वाद घेऊन गीतरामायणाची सुरुवात केली.
पुढील काही गीते ऐकल्यानंतर बालगंधर्व म्हणाले, "अशाच उत्तम चाली लावत गेलात, तर आमच्या 'स्वयंवर' नाटकाप्रमाणे ही गीतेही घरोघरी पोहोचतील." आणि तसेच झाले.
बालगंधर्वांनी संपूर्ण गीतरामायण ऐकले. त्यांना बाबूजींच्या कर्तृत्वाची पूर्ण जाण होती. त्यांनी 'विठ्ठल रखुमाई' या बोलपटात संत तुकारामांची भूमिका करण्यास तसेच त्यातील काही अभंग गाण्यास संमती दिली. हा बाबूजींचा मोठा गौरव होता. 'विठ्ठल रखुमाई' या बोलपटाची निर्मिती बाबूजी करीत होते.
'राम जन्मला गं सखे' या गीताच्या वेळीही एक रंजक प्रसंग घडला. अण्णा, म्हणजे ग. दि. माडगूळकर, त्यांच्या गावी गेले होते. त्यांच्या घरी रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असे. त्या निमित्ताने अनेक पाहुणे आले होते. घर गजबजले होते; परंतु अण्णांना गीत लिहायचे होते. शेवटी ते एका खोलीत जाऊन शांतचित्ताने लिहायला बसले. त्यांनी गीत लिहिण्यास सुरुवात केली—
"चैत्रमास, त्यात शुद्ध नवमी ही तिथी,
गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती,
दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला?"
इतक्यात त्यांची पत्नी वारंवार येऊन विचारत होती, "गाणे लिहून झाले का? लोक तुमची वाट पाहत आहेत." त्यावर अण्णांनी हसत उत्तर दिले, "नाही. अजून प्रसूती झालेली नाही. रामाचा जन्म व्हायचा आहे; कुणा माडगूळकरांचा नव्हे! त्यांना थांबायला सांगा. आणखी थोडा वेळ थांबतील आणि मग जेवूनच जातील."
असे हे प्रतिभावान कविराज ग. दि. माडगूळकर!
'दशरथा, घे हे पायसदान' हे गीत म्हणताना बाबूजींनी 'पायसदान' या शब्दाचे वजन किती समर्थपणे सांभाळले आहे, हे प्रकर्षाने जाणवते. गीतरामायणातील प्रत्येक गीत, त्यातील शब्द आणि चाली इतक्या उत्कट आहेत की श्रोता ते गीत आपसूकच गुणगुणू लागतो.
'दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा' या गीतातून माडगूळकरांनी गहन तत्त्वज्ञान मांडले आहे; तर यमन कल्याण रागातील बाबूजींची सुरावट श्रोत्यांच्या मनावर गारुड घालते. बाबूजींच्या कंठातून साकारलेली शेवटची भैरवी अत्यंत मधुर आहे. तिचे शब्द आहेत—
"अवघ्या आशा श्रीरामार्पण,
श्रीराम, श्रीराम."
ग. दि. माडगूळकरांची शब्दसरिता आणि बाबूजींची स्वरगंगा यांच्या संगमात श्रोत्यांना वर्षभर स्नान करण्याचे पुण्य लाभले. ग. दि. माडगूळकरांच्या रचनेत जशी सुगमता आहे, तसाच भारदस्तपणाही आहे. त्यांच्या कल्पनासौंदर्याने रसिकांना भुरळ घातली. ग. दि. माडगूळकर शब्दसृष्टीचे ईश्वर, तर बाबूजी स्वरसृष्टीचे ईश्वर वाटतात. दोघे एकत्र आल्यामुळे जणू मणिकांचन योग साधला.
मधुसूदन कालेलकर म्हणतात, "ग. दि. माडगूळकर यांनी गीतरामायण सोडून दुसरे काहीही लिहिले नसते, किंवा बाबूजींनी आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त गीतरामायणालाच संगीत दिले असते, तरीही ते दोघे अजरामर झाले असते. इतके गीतरामायण भव्य, दिव्य आणि अद्भुत आहे."
ग. दि. माडगूळकर जे काही लिहीत, त्यातील एकही अक्षर नंतर बदलावे लागत नसे. बाबूजींनाही प्रत्येक प्रसंगाला योग्य राग आणि योग्य स्वर सहज सुचत. ग. दि. माडगूळकर एकेक गीत लिहून देत आणि बाबूजी त्याला तत्परतेने चाल लावत.
रामकथेचे अनेक आविष्कार झाले. निरनिराळ्या भाषांत रामायण विविध प्रकारांनी लिहिले गेले; तरीही गीतरामायणामुळे रामायण घराघरांत पोहोचले. गीतरामायणाने अनेक दिग्गजांना मोहित केले. शंकराचार्य, स्वातंत्र्यवीर सावरकर, काका कालेलकर, अटल बिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण, तुकडोजी महाराज, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे अशा कितीतरी मान्यवरांची नावे घेता येतील.
शारदा पीठाच्या शंकराचार्यांनी बाबूजींना 'स्वरश्री' ही पदवी देऊन गौरविले. गीतरामायणामुळे ग. दि. माडगूळकर आणि बाबूजी यांना मराठी माणसाच्या हृदयात कायमचे स्थान मिळाले.
त्या काळात बाबूजी अत्यंत व्यस्त होते. त्यांचे आयुष्य धावपळीचे होते; तरीही त्यांच्या हातून गीतरामायणासारखी अजरामर कलाकृती साकार झाली. ही जणू ईश्वराचीच योजना होती.
गीतरामायणातील काही गीतांत बाबूजींनी नवे प्रयोग केले. कुंभकर्णाला युद्धासाठी झोपेतून उठवले, तेव्हा त्याचा आवाज कसा असावा, याचा विचार करून त्यांनी आप्पासाहेब इनामदार यांची गायक म्हणून निवड केली. आप्पासाहेबांचा आवाज स्वाभाविकच भारदस्त होता. तरीही ध्वनिमुद्रणाच्या वेळी त्यांच्या हातात कर्णा (मेगाफोन) देण्यात आला आणि त्यात तोंड घालून गाण्यास सांगण्यात आले. कुंभकर्णाचे व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे उभे करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला. त्या प्रसंगातील गीत होते—
"लंकेवर काळ कठीण आज पातला."
त्याचप्रमाणे 'सेतू बांधा रे सागरी' हे गीत ध्वनिमुद्रित करताना अधिक वाद्यांचा वापर करून बाबूजींनी प्रसंगाला अनुरूप वातावरणनिर्मिती केली. स्टुडिओ लहान असल्यामुळे काही वादकांना स्टुडिओच्या बाहेर बसविण्यात आले. हे गीत अनेक वानरांच्या तोंडी असल्याने समूहगायनाचा प्रभाव निर्माण करणे आवश्यक होते. त्यामुळे हा अभिनव प्रयोग करण्यात आला.
शूर्पणखेच्या तोंडी 'सूड घे, लंकापती' हे गीत आहे. शूर्पणखेचे नाक आणि कान विद्रूप केल्यानंतर ती संतापाने आपल्या भाऊ रावणाकडे जाते. तिच्या मनात प्रचंड क्रोध उसळलेला असतो. ही भावना लक्षात घेऊन बाबूजींनी या गीतासाठी योगिनी जोगळेकर यांची गायिका म्हणून निवड केली आणि ती अत्यंत योग्य ठरली.
या गीतात क्रोध, उपहास आणि नाट्य यांचा प्रभावी संगम आहे. हुंदके देणे, त्वेषाने वेड लागल्यासारखे हसणे अशा संमिश्र भावनांचे दर्शन या गीतात घडते. योगिनी जोगळेकर यांनी या गीताचे अत्यंत प्रभावी सादरीकरण केले असून त्यांनी या गीताचे अक्षरशः चीज केले आहे.
श्रीरामाच्या तोंडी असलेली बहुतेक सर्व गीते बाबूजींनी गायिली आहेत. याशिवाय आशा गाडगीळ, बबनराव नावडीकर, चंद्रकांत गोखले, गजाननराव वाटवे, गौरी अय्यर, जानकी अय्यर, कालिंदी केसकर, कुमुदिनी पेडणेकर, ललिता फडके, मालती पांडे, लता मंगेशकर, माणिक वर्मा, प्रमोदिनी देसाई, राम फाटक, सुमन माटे, सुरेश हळदणकर, उषा अत्रे, वसंतराव देशपांडे, आप्पासाहेब इनामदार आणि योगिनी जोगळेकर यांनीही गीतरामायणातील गीते सादर केली आहेत. प्रत्येक गीतासाठी बाबूजींनी योग्य गायक किंवा गायिकेची निवड केली. त्यामुळे गीतरामायण ही गीतमालिका अत्यंत यशस्वी ठरली.
शेवटच्या गीताच्या वेळीही एक रंजक प्रसंग घडला. 'दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा' हे ते गीत. बाबूजी चाल लावण्यासाठी मुंबईहून रात्री पुण्याला आले. ग. दि. माडगूळकर त्यांना रात्री गीत देणार होते आणि बाबूजी त्या गीताला चाल लावून दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशवाणीवरून त्याचे प्रक्षेपण करणार होते. मात्र, ग. दि. माडगूळकर यांनी ते गीत रात्री दिले नाही. सकाळी साडेसातनंतर बाबूजींच्या हातात गीत आले.
त्या गीताला आठ कडवी होती. बाबूजींनी संपूर्ण गीत वाचले. त्यांनी पहिल्या दोन ओळींना चाल लावली आणि ती वादकांना आकाशवाणी केंद्रावर पाठवली. परंतु त्या चालीबद्दल त्यांचे समाधान झाले नव्हते. रिक्षाने आकाशवाणी केंद्रावर जात असताना त्यांना नवी चाल सुचली. केंद्रावर पोहोचल्यावर त्यांनी ती चाल वादकांना सांगितली आणि कोणतीही पूर्वतयारी न करता संपूर्ण गीत ध्वनिमुद्रित करण्यात आले.
असे हे दोघे दिग्गज—बाबूजी आणि ग. दि. माडगूळकर!
'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हे गीत ऐकून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
इतिहाससंशोधक महोपाध्याय डॉ. दत्तो वामन पोतदार म्हणतात, "अस्सल मराठी बाण्याचे कवी ग. दि. माडगूळकर यांनी आपल्या गीतरामायणाचा कौस्तुभमणी महाराष्ट्र शारदेच्या गळ्यात बांधला आहे."
बाबूजींनी सर्व गीतांची स्वररचना अशी केली आहे की कुठेही स्वर शब्दांपेक्षा वरचढ ठरत नाहीत. रसिकांच्या मनावर शब्दांचा अर्थ प्रभावीपणे बिंबवणे हा त्यामागील मुख्य हेतू होता.
गीतरामायणातील सर्व गीते भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित आहेत. प्रत्येक रागाचा स्वतःचा एक विशिष्ट रस असतो—उदा., वीररस, शृंगाररस, करुणरस इत्यादी. बाबूजींनी प्रत्येक गीतातील भावना ओळखून त्या अनुषंगाने योग्य रागाची निवड केली. त्यामुळे संपूर्ण गीतरामायण अत्यंत प्रभावी, उत्कट आणि चिरस्मरणीय झाले.
संपूर्ण वर्षभर ही गीते प्रसारित झाल्यानंतर बाबूजी गीतरामायणाचे गावोगावी कार्यक्रम करीत असत. आजही अनेक कलाकार गीतरामायणाचे कार्यक्रम सादर करतात. तरीही त्यातील ताजेपणा आणि नावीन्य तसूभरही कमी झालेले नाही.
गीतरामायण आणि सुधीर फडके यांचे नाव एकत्रच घेतले जाते. अनेकांच्या मनात गीतरामायण म्हणजेच सुधीर फडके अशीच प्रतिमा निर्माण झाली आहे. गीतरामायणाच्या अनेक ध्वनिफिती, ध्वनिमुद्रिका आणि नंतरच्या काळात इतर ध्वनिमाध्यमांवरही आवृत्त्या प्रकाशित झाल्या. त्या भारतात तसेच परदेशातही लोकप्रिय झाल्या. तरीसुद्धा सुधीर फडके स्वतः गीतरामायण सादर करीत असत, तेव्हा कार्यक्रमस्थळी प्रचंड गर्दी होत असे. यावरून गीतरामायणाचे असामान्य आकर्षण लक्षात येते.
बाबूजींनी गीतरामायणाचे जवळपास पंधराशे कार्यक्रम केले. महाराष्ट्राबरोबरच बिहार, ओडिशा, आसाम आणि राजस्थान वगळता भारतातील जवळजवळ सर्व राज्यांत हे कार्यक्रम झाले. परदेशात लंडन, मँचेस्टर, न्यूयॉर्क, शिकागो, टोरांटो, फिलाडेल्फिया आणि मॉरिशस येथेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एकट्या नागपूरमध्येच गीतरामायणाचे शंभरहून अधिक कार्यक्रम झाले.
गीतरामायणाची लोकप्रियता पाहून एच. एम. व्ही. कंपनीने १९६१ मध्ये त्यातील काही निवडक गीते ध्वनिमुद्रित करण्याचा प्रस्ताव बाबूजींसमोर मांडला. मात्र, बाबूजींनी तो प्रस्ताव नाकारला. ते म्हणाले, "सर्व ५६ गीते ध्वनिमुद्रित झाली पाहिजेत आणि प्रत्येक गायकाला पाच टक्के रॉयल्टी तसेच संगीतदिग्दर्शकाला अडीच टक्के रॉयल्टी मिळाली पाहिजे." त्यानंतर सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून गीतरामायण एच. एम. व्ही. कंपनीने ध्वनिमुद्रिकांवर प्रकाशित केले. बाबूजींनी कंपनीकडून आगाऊ रॉयल्टीही स्वीकारली. एखाद्या व्यावसायिक ध्वनिमुद्रण कंपनीकडून आगाऊ रॉयल्टी स्वीकारणारे ते बहुधा पहिलेच मराठी संगीतदिग्दर्शक होते.
गीतरामायणाचे ध्वनिमुद्रण करताना प्रत्येक गीताच्या सुरुवातीला त्या प्रसंगाचे निवेदन बाबूजींनी स्वतःच्या आवाजात केले आहे आणि त्यानंतर गीत सादर झाले आहे. हे प्रसंग ते अत्यंत प्रभावीपणे रंगवत असत.
यातील 'माता न तू वैरिणी' या गीताच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी एक रंजक प्रसंग घडला. हे गीत भरताच्या तोंडी आहे. आपल्या आईमुळे श्रीरामांना वनवास भोगावा लागला, हे कळल्यावर भरत संतापतो आणि "तू माझी माता नाहीस; तू माझी वैरिणी आहेस," अशा भावनेने तो हे गीत म्हणतो.
ध्वनिमुद्रण सुरू झाल्यावर बाबूजी अत्यंत उच्च स्वरात आणि तीव्र भावनेने हे गीत गाऊ लागले. त्या वेळी ध्वनिमुद्रण अभियंता श्री. माधव माडगावकर म्हणाले, "एवढ्या मोठ्या आणि कर्कश स्वरात गाऊ नका." त्यावर बाबूजी म्हणाले, "मी हे गीत याच पद्धतीने गाणार."
दुसऱ्या दिवशी माडगावकरांनी ध्वनिमुद्रण पुन्हा ऐकले. तेव्हा त्यांनाही बाबूजींचा दृष्टिकोन योग्य असल्याचे पटले, कारण भरताच्या मनातील संताप त्या गायनशैलीतून प्रभावीपणे व्यक्त झाला होता.
गीतरामायणाच्या जाहीर कार्यक्रमांना पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुण्यात 'अयोध्या नगरी' उभारून दहा दिवसांचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. मात्र, हे यश पाहण्यासाठी ग. दि. माडगूळकर हयात नव्हते.
बाबूजींनी गीतरामायणाला संगीत दिले आणि अनेक गीते स्वतः गायली. वसंत आजगावकर यांनीही गीतरामायणाचे जाहीर कार्यक्रम केले. १९५९ मध्ये त्यांनी गीतरामायणाचा स्वतंत्र सार्वजनिक कार्यक्रम सादर केला. एका संगीतकाराने संगीतबद्ध केलेली कलाकृती दुसऱ्या संगीतकाराने इतक्या आत्मीयतेने सादर करणे, ही खरोखरच उल्लेखनीय घटना होती.
पुढे गीतरामायणाचे हिंदी भाषांतर झाले आणि संपूर्ण हिंदी गीतरामायण वसंत आजगावकर यांनी गायले. अवघ्या काही दिवसांच्या तयारीनंतर त्यांनी हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. अशा प्रकारे हिंदी गीतरामायणाची परंपराही सुरू झाली.
श्रीराम हे हिंदू समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे आजही रामकथा आणि गीतरामायण घरोघरी वाचले, ऐकले आणि गायले जाते.
गीतरामायण पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रक्षेपित होत असताना अनेक भाविक रेडिओसमोर उदबत्ती लावून, भक्तिभावाने त्याचे श्रवण करीत असत.
यावरून रामायण आणि गीतरामायण यांचा मराठी मनावर किती गाढ प्रभाव आहे, याची प्रचीती येते.