सुधीर फडके
सुधीर फडके
शब्द आणि भावनांना सुरांची साथ देत अजरामर सुगमसंगीताची निर्मिती करणारा स्वरगंधर्व
बाबूजींच्या मनात जाज्वल्य देशप्रेम होते. संगीताखेरीज त्यांच्या मनात नेहमी राष्ट्रभक्तीचे विचार असत. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला; परंतु तरीही दादरा-नगर हवेली, गोवा अशा काही प्रदेशांवर पोर्तुगीजांची सत्ता कायम होती. ही बाब बाबूजी आणि त्यांच्यासारख्या समविचारी मंडळींच्या मनाला सतत सलत होती. १९५४ साली या परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष उभारण्याचे बेत ही मंडळी आखू लागली. त्या वेळी बाबूजींनी आपल्या पत्नी सौ. ललिता फडके यांच्यासह काही काळ संगीतक्षेत्रातील कार्य बाजूला ठेवून या राष्ट्रीय कार्यात स्वतःला झोकून दिले.
सिल्वासा आणि दादरा-नगर हवेली मुक्तिसंग्रामात अनेकांनी सहभाग घेतला. बाबासाहेब पुरंदरे, बिंदूमाधव जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते तसेच गोवा मुक्तिसंग्रामातील कार्यकर्ते हे त्यांतील प्रमुख सहभागी होते.
गोवा मुक्तिसंग्रामासाठी काही तरुण सिद्ध झाले होते. हे तरुण बाबूजींच्या मुंबईतील घरी कधीही येत असत. मात्र, सुरुवातीला ते का येतात, हे बाबूजींनी आपल्या पत्नीला सांगितले नव्हते. अखेरीस त्यांना ही गोष्ट सांगणे भाग पडले.
त्याचे कारण असे घडले की, एकदा त्यांच्या घरी काही कार्यकर्ते राहण्यासाठी आले. त्यांच्या पिशव्यांमध्ये श्रीधर यांना काही पिस्तुले दिसली. श्रीधर यांनी ही गोष्ट आईला सांगितली. साहजिकच ललिताबाईंच्या मनात प्रश्न निर्माण झाला, "हे लोक पिशव्यांमध्ये पिस्तुले घेऊन का आले आहेत?" त्यांनी यासंबंधी बाबूजींकडे चौकशी केली. तेव्हा बाबूजी म्हणाले, "आम्ही थोड्याच दिवसांत नगर हवेलीवर हल्ला करणार आहोत."
त्या वेळचे सरकार पोर्तुगीज सत्तेविरुद्ध काही ठोस पाऊल उचलेल, असे वाटत नव्हते. सरकारचे धोरण अनाकलनीय वाटत होते. अशा कारवाईसाठी शस्त्रे आणि दारुगोळा आवश्यक होता. त्यासाठी निधी कसा उभारायचा, हा प्रश्न होता. शेवटी पुण्यात लता मंगेशकर यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करून निधी गोळा करण्याचे ठरले. कार्यक्रमाच्या दिवशी त्या मुंबईहून पुण्याकडे मोटारीने निघाल्या; मात्र वाटेत त्यांचा अपघात झाला. तरीही अनेक अडचणींवर मात करून कार्यक्रम नियोजनाप्रमाणे पार पडला. या कार्यक्रमातून मिळालेल्या निधीतून शस्त्रे आणि दारुगोळा खरेदी करण्यात आला.
गोव्यात 'आझाद गोमांतक दल' या संघटनेचे विश्वनाथ लवंदे, शामराव लाड, करमळकर यांसारखे कार्यकर्ते होते. मुंबई आणि पुण्यातील काही कार्यकर्तेही त्यांच्यात सहभागी झाले. त्यानंतर गुप्त बैठका सुरू झाल्या. या बैठकींमध्ये प्रथम दादरा-नगर हवेली ताब्यात घ्यायची आणि त्यानंतर गोव्याच्या मुक्तीचा विचार करायचा, असे ठरले.
कारवाईपूर्वी तेथील परिस्थितीची माहिती मिळवण्यासाठी 'तपोवन' आश्रमाच्या मदतीसाठी सुधीर फडके आणि ललिता फडके यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रम तर झाला; पण त्याचबरोबर पोर्तुगीज सैनिकांची संख्या किती आहे, सिल्वासाला जाणारे रस्ते किती आहेत, तेथील रहिवासी मदत करतील का, याचीही माहिती गोळा करण्यात आली. सिल्वासात प्रवेश करताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. फडके दांपत्याने रुग्णांचे सोंग घेतले होते. त्यांना "डॉक्टरांकडे घेऊन जात आहोत," असे तेथील स्नेही जयंतीभाई देसाई यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सिल्वासात प्रवेश करण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे सर्वांनी आवश्यक टेहळणी पूर्ण केली.
या संपूर्ण कालावधीत बाबूजींचे घर जणू लढ्याचे केंद्रच बनले होते. तेथे कार्यकर्ते येत, चर्चा होत आणि "काय करायचे, कसे जायचे, कधी जायचे आणि कोण जायचे," यावर सविस्तर मंथन होत असे.
अखेरीस १९५४ सालच्या जुलै महिन्याच्या अखेरीस, अमावस्येच्या गडद अंधारात आणि मुसळधार पावसात 'आझाद गोमांतक दल' चे सैनिक नगर हवेलीच्या हद्दीत शिरले. भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांना वारंवार सावध केले, "सिल्वासाला जाऊ नका. तेथे सशस्त्र पोलीस आहेत. निशस्त्र लोकांचा त्यांच्यापुढे निभाव लागणार नाही." मात्र, या इशाऱ्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. अखेरीस अपेक्षेपेक्षा अत्यल्प संघर्षातच सिल्वासा त्यांच्या ताब्यात आले. ही सर्व घटना ३१ जुलै ते २ ऑगस्ट १९५४ या तीन दिवसांत घडली.
सिल्वासावर हल्ला करण्यापूर्वी तेथे तीस-चाळीस कार्यकर्ते एक-दोन दिवस आधी जमा झाले होते. सलग दहा-बारा दिवस मुसळधार पाऊस पडत होता. काही जण वापी स्थानकावर उतरले, तर काही त्याच्या आधीच्या स्थानकावर उतरले. त्यानंतर सर्वांनी अंधारात पायी चालण्यास सुरुवात केली. काही अंतर चालल्यानंतर दमणगंगा नदी लागली. नदी कशी ओलांडायची, हा प्रश्न निर्माण झाला. शेवटी मोहनराव रानडे यांनी कमरेला जाड दोरी बांधून नदी पार केली. त्यानंतर इतर सर्व जण तीच दोरी धरून सुरक्षितपणे पलीकडे गेले.
या कार्यकर्त्यांनी आपल्याबरोबर फटाका-बॉम्ब आणले होते. त्यांनी दोन-तीन गट केले आणि वेगवेगळ्या दिशांनी पांगले. काही वेळातच एकामागून एक बॉम्ब फुटू लागले. त्यामुळे पोलीस घाबरून गेले. त्यांना वाटले की, चहूबाजूंनी हल्ला झाला आहे. म्हणून त्यांनी चौकीचे दरवाजे बंद करून घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांवर धाड टाकून त्यांच्याकडील पिस्तुले ताब्यात घेतली आणि संपूर्ण चौकी आपल्या नियंत्रणाखाली आणली. अशा प्रकारे फारसा संघर्ष न होता सिल्वासा मुक्त झाले. सिल्वासावर भारताचा तिरंगा फडकू लागल्यामुळे बाबूजींना अत्यंत आनंद झाला.
त्यानंतर दहा-बारा ऑगस्टच्या सुमारास दादरा-नगर हवेली पूर्णपणे मुक्त झाली.
नगर हवेलीच्या उठावात श्री. मोहन रानडे हे बाबूजींचे जिवलग मित्र झाले होते. १९५५ मध्ये मोहन रानडे यांनी गोमंतकात उठाव केला; मात्र ते पोर्तुगीजांच्या ताब्यात सापडले. पोर्तुगीजांनी त्यांना लिस्बनच्या तुरुंगात २८ वर्षे कारावास भोगण्यासाठी डांबून ठेवले. मोहन रानडे यांच्याबरोबर तेलू मस्कारान्हेस यांनाही तुरुंगात डांबण्यात आले होते. बाबूजी आणि त्यांचे सहकारी या दोघांच्या सुटकेसाठी प्रयत्न करू लागले.
मोहन रानडे यांच्या सुटकेसाठी बाबूजींनी 'वीर रानडे विमोचन समिती' स्थापन केली. रानडे यांची सुटका व्हावी, यासाठी त्यांनी जिवापाड परिश्रम घेतले. त्यांनी अनेक वेळा गोव्याच्या फेऱ्या मारल्या. पोर्तुगीज भाषेतील कागदपत्रांचे इंग्रजीमध्ये भाषांतर करून घेतले. मोहन रानडे यांच्या मुक्ततेसाठी प्रीती कामत कार्य करीत होत्या. बाबूजी त्यांच्याशी अनेकदा दूरध्वनीवरून संपर्क साधत असत. ब्राझील आणि मेक्सिकोच्या वकिलाती तसेच 'ॲम्नेस्टी इंटरनॅशनल' या संस्थेशीही त्यांनी संपर्क साधला. एकदा तर या कामासाठी ते इंग्लंडलाही गेले.
या कार्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांनी दोन-तीन चित्रपटांचे संगीतदिग्दर्शन स्वीकारले नाही. अनेक गायनाचे कार्यक्रमही त्यांनी सोडले. आर्थिक अडचणी असतानाही "मोहन रानडे यांची मुक्तता करणे अधिक महत्त्वाचे आहे," असे त्यांना वाटत होते. मोहन रानडे यांचे शिक्षण पूर्ण झाले नव्हते आणि त्यांचे वयही कमी होते. त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्याविषयी बाबूजींना सतत चिंता वाटत होती. मोहन रानडे यांच्या आई निराश झाल्या होत्या. त्यांना मानसिक आधार देणे हेही बाबूजींनी आपले कर्तव्य मानले.
मोहन रानडे यांच्या पुढील आयुष्यासाठी आर्थिक तरतूद व्हावी, यासाठी बाबूजींनी घरोघरी आणि गावोगावी जाऊन निधी गोळा केला. अनेक जण बाबूजींच्या घरी येऊन 'वीर रानडे विमोचन समिती' कडे देणगी जमा करीत असत. अखेरीस सर्वांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि १ फेब्रुवारी १९६९ रोजी मोहन रानडे यांची सुटका झाली. त्यानंतर ते मायदेशी परतले. पुढे तेलू मस्कारान्हेस यांचीही सुटका झाली.
बाबूजी जे कार्य हाती घेत, ते पूर्णत्वास जाईपर्यंत त्यांना स्वस्थ बसवत नसे.
संगीतक्षेत्राव्यतिरिक्त बाबूजींनी केलेले कार्यही तितकेच विस्मयकारक आहे. कोणतेही कार्य हाती घेतले की, ते त्यात आपले सर्वस्व झोकून देत. ते अविश्रांत परिश्रम करीत आणि कार्य पूर्णत्वास नेल्याशिवाय स्वस्थ बसत नसत.
बाबूजींनी संगीत क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी केली, पण हे करत असताना त्यांचे सामाजिक भान कधीही सुटले नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंदापूरच्या एका खेड्यात एका दलित स्त्रीला विवस्त्र करून तिची गावातून धिंड काढण्यात आली. ही बातमी ऐकून बाबूजी अत्यंत अस्वस्थ झाले. एखाद्या स्त्रीची अशा पद्धतीने विटंबना करणे, त्यांना अजिबात आवडले नाही. या घटनेचा निषेध करण्यासाठी म्हणून त्यांनी मुंबईला हुतात्मा चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करायचे असे ठरविले. ‘भारतीय जनसंघा’ने सुद्धा त्याच दिवशी उपोषणाचा कार्यक्रम जाहीर केला. बाबूजींना कुठल्याही पद्धतीने या कार्यक्रमाला राजकीय रंग येऊ द्यायचा नव्हता म्हणून त्यांनी हुतात्मा चौकात आपला वेगळा तंबू घातला, व ते उपोषणास बसले.
अयोध्येत ‘राम मंदिर मुक्ती लढ्या’मध्ये त्यांनी मागचा पुढचा कुठचाही विचार न करता भाग घेतला. खरंतर त्यावेळी ते सावरकरांच्या वर चित्रपट काढत होते. जर या लढ्यामध्ये काही वेडेवाकडे झाले असते तर काय झाले असते, याचा विचार त्यांनी केला नाही. त्यांना वाटत होते की या मुक्ती संग्रामात भाग घेतलाच पाहिजे, कारण आपल्या इतक्या पिढ्यांचे पराभूत मनोवृत्तीचे लक्षण दूर केले पाहिजे.
चीन युद्धाच्या समाप्तीनंतर भारत सरकारच्या पुनर्वसन कार्यास मदत करण्यासाठी - बाबूजींनी ‘मराठी चित्रपट राष्ट्रीय संरक्षण निधी’ची स्थापना केली, व तीन-चार लाख रुपये जमा करून सरकारला सुपूर्त केले. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय आपत्ती आल्या, तेव्हा त्यांनी अनेक गाण्याचे कार्यक्रम करून पैसे जमा केले, व आपल्या परीने सरकारला मदत केली. काही वर्षे ते ‘भारतीय ग्राहक पंचायती’च्या मुंबई शाखेचे ‘प्रमुख’ म्हणूनही कार्यरत होते.
याशिवाय ते ‘मराठी चित्रपट महामंडळा’चे अनेक वर्षे पदाधिकारी, व अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय कालखंडात त्यांनी महामंडळाला स्वतःची जागा मिळवून दिली. ‘संगीत दिग्दर्शकांच्या संघटने’चेही ते अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक कामे करून दाखवली.
बाबूजी एका अर्थाने कृत-कृत्य, व परिपूर्ण आयुष्य जगले.
ध्यास म्हणजे काय? समर्पण कसे करतात? एखादी गोष्ट ठरवली, एखादं स्वप्न बघितले की ते पूर्ण कसे करायचे? हे समजून घ्यायचे असेल तर सुधीर फडके यांचे आयुष्य बघावे. संगीत-साधने बरोबर त्यांनी समाजासाठी अनेक गोष्टी केल्या. नुसत्या ‘केल्या’ असं म्हणणं योग्य होणार नाही, तर या गोष्टी त्यांनी सर्वस्व अर्पून केल्या.
१९७३-७४ ची गोष्ट आहे. त्यावेळी हिंदी चित्रपटांच्या मुळे मराठी चित्रपट व्यवसायाला हलाखीचे दिवस आले होते. मराठी चित्रपटांच्या ध्वनि-मुद्रणासाठी रेकॉर्डिंग स्टुडिओज मिळत नव्हते. मिळाले तर - ते मराठी निर्मात्यांना परवडणारे नव्हते, आणि त्यामुळे मराठी सिनेमाची चित्रपट निर्मिती दीर्घकाळ लांबणीवर पडे. यावेळी ग. दि. माडगूळकर, व बाबूजी यांनी ठरवले की मुंबई किंवा पुणे इथे फक्त मराठी चित्रपटांच्या साठी एक साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ काढायचा. महाराष्ट्र सरकारकडून जागा मिळवायची, व महाराष्ट्रातील रसिकांकडून देणग्या मिळवायच्या. कार्यक्रम करायचे, व बांधकामासाठी पैसा उभा करायचा. परदेशातील मराठी रसिकांच्या सहाय्याने रेकॉर्डिंग ची मशीनरी, व इतर साहित्य जमा करायचे. एकदा ठरले - की बाबूजी त्यात आपले सर्वस्व अर्पण करायचे. एखादी गोष्ट पूर्ण होईस्तोवर त्यांना अजिबात चैन पडायचे नाही. ते स्टुडिओसाठी मशिनरी आणण्यासाठी अमेरिकेत गेले. त्यांनी तिथल्या लोकांना सर्व कल्पना सांगितली, आणि मग अमेरिकेत राहणारे दिलीप वि. चित्रे यांनी त्यांना तिथले स्टुडिओज कसे असतात, ध्वनिमुद्रणाचे तंत्र कसे असते, मशिनरी कशी असते, या सर्वासाठी खर्च किती येईल हे शोधून काढायला मदत केली. या गोष्टीवरून सांगायचे एवढेच की एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण होईपर्यंत बाबूजींना दुसरे काही सुचत नसे.