सुधीर फडके
सुधीर फडके
शब्द आणि भावनांना सुरांची साथ देत अजरामर सुगमसंगीताची निर्मिती करणारा स्वरगंधर्व
१९१९ - २५ जुलै रोजी कोल्हापूर येथे जन्म (मूळ नाव रामचंद्र विनायक फडके).
१९२८ - बाबूजी अवघे आठ-नऊ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे (सरस्वतीबाई) क्षयरोगाने निधन.
१९३० - पुढील शिक्षणासाठी डॉ. भाजेकर यांच्यासोबत मुंबईला प्रयाण.
१९३१-३२ - शास्त्रीय संगीत स्पर्धेत अब्दुल करीम खाँ साहेबांसमोर गायन करून प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यांच्याकडून कौतुक.
१९३४ - गणेशोत्सवात एका जाहिरातीसाठी न. ना. देशपांडे यांनी 'राम' या नावाचे 'सुधीर' असे नामकरण केले.
१९३६ - वडिलांचे निधन झाले आणि सुधीर पोरका झाला. नंतर नशीब आजमावण्यासाठी पुन्हा मुंबईला प्रयाण.
१९३९ - मुंबईत हलाखीचे दिवस काढल्यानंतर १ सप्टेंबर रोजी मुंबई सोडली व गायक म्हणून नशिब आजमावण्यासाठी भारतभर भटकंती सुरू केली.
१९४१ - एच.एम.व्ही. कंपनीत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू आणि कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात.
१९४६ - 'गोकुळ' (हिंदी) आणि 'रुक्मिणी स्वयंवर' (मराठी) या चित्रपटांतून स्वतंत्र संगीत दिग्दर्शक म्हणून प्रवेश.
१९४८ - 'जीवाचा सखा' (स्वतंत्र संगीत दिग्दर्शन), 'सीता स्वयंवर' आणि 'वंदे मातरम्' या चित्रपटांना संगीत दिले, ज्यामुळे त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली.
१९४९ - २९ मे रोजी प्रसिद्ध गायिका ललिता देऊळगावकर यांच्याशी विवाह.
१९५० - मुलगा श्रीधर फडके यांचा जन्म.
१९५१ - य. गो. जोशी यांच्यासोबत 'विठ्ठल रखुमाई' चित्रपटाची निर्मिती.
१९५४ - पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी 'दादरा नगर हवेली (सिल्वासा) मुक्ती संग्रामात' प्रत्यक्ष सहभाग.
१९५५ - १ एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून 'गीतरामायण'ची निर्मिती आणि प्रसारण सुरू झाले.
१९६१ - 'हा माझा मार्ग एकला' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.
१९६३ - 'हा माझा मार्ग एकला' या चित्रपटाला 'राष्ट्रपती पदक' आणि 'महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवा'त उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार मिळाला.
१९६७ - 'फेशियल पॅरॅलिसिस'चा झटका आला, तरीही प्रकृतीची पर्वा न करता कोयना भूकंपग्रस्तांसाठी मदतनिधीचे कार्यक्रम केले.
१९६९ - १ फेब्रुवारी रोजी पोर्तुगीजांच्या कैदेत असलेल्या मोहन रानडे यांची सुटका (बाबूजींनी 'वीर रानडे विमोचन समिती' स्थापन केली होती).
१९९१ - 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' प्राप्त.
१९९६ - व्ही. शांताराम पुरस्कार आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे 'गोदावरी पुरस्कार'.
१९९८ - 'दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'.
२००१ - महाराष्ट्र शासनातर्फे 'लता मंगेशकर पुरस्कार' आणि 'अल्फा जीवनगौरव पुरस्कार' प्राप्त. याच वर्षी १६ नोव्हेंबरला त्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन निर्माण केलेला 'वीर सावरकर' हा चित्रपट प्रदर्शित झाला.
२००२ - 'सह्याद्री स्वर-रत्न पुरस्कार' प्राप्त. २४ जुलैला हिंदुजा रुग्णालयात दाखल आणि २९ जुलै रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी मुंबईत निधन.